IND vs NZ Saba Karim on Mohammed Siraj : बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडने भारताचा ८ विकेट्सनी पराभव करत ३६ वर्षांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यातील पाचव्या दिवशी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी केली, पण त्याला विकेट घेता आली नाही. नवीन चेंडू आणि ढगाळ वातावरण असूनही सिराज विकेट घेण्यात अपयशी ठरला. मात्र, जसप्रीत बुमराहने दोन विकेट्स घेतल्या. त्यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम यांनी मोहम्मद सिराजच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
सबा करीम काय म्हणाले?
माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम यांनी सांगितले की, सिराजवर दबावाखाली आहे आणि भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निवडण्यापूर्वी त्याच्याशी चर्चा केली पाहिजे. या स्थितीत आकाशदीप त्याच्यापेक्षा चांगला गोलंदाज ठरू शकतो, असा विश्वास सबा यांना विश्वास आहे. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात शानदार गोलंदाजी करताना दोन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, भारताला दुसऱ्या डावात विजयासाठी विकेट्सची गरज असताना, तो विकेट मिळवून देण्यात अपयशी ठरला.
मोहम्मद सिराजवर कोणता तरी दबाब –
सबा करीम म्हणाले, “मला वाटते की मोहम्मद सिराजवर कोणता तरी दबावाखाली आहे. त्यामुळे मला वाटते दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन निवडण्यापूर्वी त्यावर चर्चा करेल. कारण कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज म्हणून तुम्ही नवीन चेंडूने विकेट घेणे अपेक्षित असते. त्याचबरोबर जुन्या चेंडूने चांगली गोलंदाजी करावी, अशी आशा असते. आतापर्यंत मला असे वाटत नाही की सिराजने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्यापेक्षा आकाशने चांगली कामगिरी केली आहे. तसेच त्याने लवकर विकेट घेत संघाला हातभार लावलेला आहे.”
आकाशला अशा खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्याचा अनुभव –
आकाशबद्दल बोलताना सबा करीम म्हणाले, “तसेच, आकाशला भारतीय परिस्थितीत अशा खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्याचा पुरेसा अनुभव आहे. कारण तो अनेक वर्षांपासून बंगालकडून खेळत आहे. त्यामुळे खेळपट्ट्या गोलंदाजीसाठी अनुकूल असल्या तरीही अशा खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्याचा अनुभव असणारी व्यक्ती तुमच्या संघात असावी असे तुम्हाला वाटते.” जसप्रीत बुमराहशिवाय भारतीय संघाचे इतर गोलंदाज सामन्याच्या शेवटच्या दिवशी विकेट घेऊ शकले नाहीत. बुमराहने सर्वाधिक ८ षटके टाकली आणि दोन विकेट्स घेतल्या.