IND vs NZ Mohammad Shami First Reaction: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना हा भारताच्या विक्रमी विजयसह खेळाडूंसाठी सुद्धा रेकॉर्ड मेकिंग ठरला. विराट कोहलीने केलेले शतकांचे अर्धशतक तर मोहम्मद शमीने विश्वचषकात गाठलेलं विकेट्सचं अर्धशतक भारतासाठी कालचा सामना सगळी स्वप्न पूर्ण करणारा ठरला. मोहम्मद शमीने यंदा १७ सामन्यांमध्ये ५० विकेट्स घेतल्या आहेत तर डब्बा चार सामन्यांमध्ये त्याने ५-५ विकेट्स घेत पराक्रम केला आहे. न्यूझीलंडच्या फॉर्ममधील फलंदाजांसमोर शमीने केवळ ५७ धावा देत ७ विकेट्स घेतल्या आहेत. सामन्याचा शेवट गोड झाला असला तरी एक क्षण होता जिथे पुन्हा एकदा भारताला विश्वचषक हातातून निसटून जाण्याची भीती वाटत होती. त्यावेळी शमीच्या मनात काय भावना होती याविषयी त्याने सामन्यानंतर सामनावीर पुरस्कार स्वीकारताना भाष्य केलं आहे.
शमी म्हणाला की, ” गेल्या दोन विश्वचषकांमध्ये आम्ही (उपांत्य फेरीत) हरलो, आता पुढची संधी आम्हाला कधी मिळेल कोणास ठाऊक? म्हणून, आम्हाला यासाठी सर्व काही करायचे होते, ही संधी आम्ही सोडू इच्छित नव्हतोच. मी विल्यमसनचा झेल सोडला, तेव्हा मला खूपच वाईट वाटलं पण तेव्हा लक्ष विचलित होऊ द्यायचे नव्हते. चेंडू कधी हवेत भिरकावला जातोय आणि आम्ही कधी तो झेलतोय याकडेच संपूर्ण लक्ष होतं. दुपारी खूप धावा झाल्या होत्या. संध्याकाळी दव पडण्याची भीती होती. तरी सुदैवाने गवत नव्हते कारण जर दव असतं तर बॉल स्लिप होण्याची भीती असते आणि धावा जास्त होऊ शकल्या असत्या.”
खरंतर खेळाच्या सुरुवातीलाच शमीने दोन विकेट्स घेऊन चांगली सुरुवात केली होती पण डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांच्या दमदार भागीदारीने भारताची चिंता वाढवली होती. पण नंतर शेवटच्या १० षटकात शमीने पाच, सिराज, कुलदीप व बुमराहने प्रत्येकी १- १ विकेट घेत सगळ्यांना किवीजना माघारी धाडले.
हे ही वाचा<< “Shut Up! या मुर्खांचं तोंड..”, IND vs NZ सामन्यात भारत जिंकताच सुनील गावसकरांनी ‘या’ मंडळींची घेतली शाळा
दरम्यान, भारताचा दहावा विजय नोंदवल्यावर खेळाच्या दबावाबद्दल रोहित शर्मा म्हणाला की, “त्यावेळी आम्हाला शांत राहणे खूप गरजेचे होते. तेव्हा प्रेक्षकही शांत झाले होते, पण आम्हाला माहित होतं आता फक्त एखादी विकेट घेण्याची गरज आहे. त्याने संघाला आत्मविश्वास आला असता.” एकूणच कालच्या अटीतटीच्या सामन्यानंतर, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात आपला दहावा विजय नोंदवत भारत आता विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी भारताचा सामना होणार आहे.