भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने कसोटी क्रिकेटच्या एका डावात १० बळी घेऊन इतिहास रचला. एजाजच्या आधी इंग्लंडच्या जिम लेकर आणि भारताचा अनिल कुंबळे यांनी हा पराक्रम केला आहे.

एजाजच्या या कामगिरीनंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले. यात शरद पवारही मागे राहिलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी एजाजसाठी एक ट्वीट केले आहे. ”कसोटीत एकाच डावात दहा बळी मिळवण्याची दमदार कामगिरी केल्याबद्दल एजाज पटेलचे अभिनंदन. मुंबईत जन्मलेला आणि आता न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भाग असल्यामुळे आपल्याला अभिमानाची भावना आहे. अशी कामगिरी करणारा केवळ कसोटी क्रिकेटमधील तिसरा क्रिकेटपटू”, असे पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.

हेही वाचा – VIDEO : व्वा कॅप्टन..! न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं! वाचा कारण

एजाजने १० बळी घेत कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी साधली. एजाजच्या या भीमपराक्रमानंतर अनिल कुंबळेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुंबळेने ट्वीट करत एजाजचे अभिनंदन केले. तो म्हणाला. ”एजाज तुझं क्लबमध्ये स्वागत आहे. पर्फेक्ट १०. कसोटी सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अशी कामगिरी साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.” १९९९मध्ये अनिल कुंबळेने (२६.३-९-७४-१०) पाकिस्तानविरुद्ध १० बळी मिळवले होते.

कसोटीच्या एका डावात १० बळी घेण्याचा पराक्रम फिरकी गोलंदाजांनीच केला आहे. पण पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाने घराबाहेर हा पराक्रम केला आहे. याआधी कुंबळे आणि लेकर यांनी घरच्या मैदानावर ही कामगिरी केली होती.

Story img Loader