भारत-न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झाली. पुढीलवर्षी भारतात होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकाची तयारी ही भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या याच मालिकेपासून सुरु केली होती. परंतु पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजी किती कमकुवत आहे न्यूझीलंडच्या टॉम लॅथम आणि कर्णधार केन विलियम्सन यादोघांनी दाखवून दिले. न्यूझीलंडने टीम इंडियावर सात गडी राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. शतकवीर टॉम लॅथमला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
न्यूझीलंडने फिन अॅलन (२२), डेव्हॉन कॉनवे (२४) आणि डॅरील मिचेल (११) यांना ८८ धावांत सुरुवातीलाच गमावले. कर्णधार केन विलियम्सन व टॉम लॅथम यांनी डाव सावरला. न्यूझीलंडचे सलामीवीर फारशी काही चमकदार कामगिरी करू शकले नाही. केन विलियम्सन आणि टॉम लॅथम यांच्या २२१ धावांच्या भागीदारीमुळे किवी संघाने सात गडी राखून लक्ष्य गाठले. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने ४७.१ षटकांत ३ बाद ३०९ धावा करून विजय मिळवला. केन ९८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ९४ धावांवर,तर लॅथम १०४ चेंडूंत १९ चौकार व ५ षटकारांसह १४५ धावांवर नाबाद राहिले.
न्यूझीलंड डावाच्या ३६व्या षटकात भारताला कर्णधार शिखर धवनने ढिसाळ क्षेत्ररक्षण करत किवी कर्णधार केन विलियम्सनचा साधा झेल सोडला आणि तिथूनच सामन्याला खरी कलाटणी मिळाली. अनअनुभवी टीम इंडियाच्या गोलंदाजांचा लॅथम-विलियम्सन जोडीने फायदा उठवत शार्दूल ठाकूरच्या एका षटकात तब्बल २५ धावा चोपल्या. भारताविरुद्ध त्याने हे दुसरे शतक झळकावले. त्याआधी त्याने कोलकाताच्या इडन गार्डनवर भारताविरुद्ध शतकी खेळी केली होती.
तत्पूर्वी, शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताच्या दोन युवा गोलंदाजांनी यांनी एकदिवसीयमध्ये पदार्पण केले. टी२० मध्ये शानदार प्रदर्शन केलेला डावखुरा स्विंग गोलंदाज अर्शदीप सिंग आणि भारताची तोफ समजल्या जाणाऱ्या वेगवान गोलंदाज उमरान मलिक या दोघांना आजच्या सामन्यात अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले होते. त्याने दोन गडी बाद केले. तर शार्दूल ठाकूरला एक गडी बाद करण्यात यश आले. ऑकलंड येथे सुरु असलेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाने ते आमंत्रण स्वीकारत कर्णधार शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी १२४ धावांची सलामी भागीदारी दिली. २४ षटकात भारताने १२४ धावा केल्या होत्या. पण लागोपाठ शिखर धवन ७२ आणि शुबमन गिल ५० धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला यष्टीरक्षक ऋषभ पंत याने अवघ्या १५ धावा केल्या. त्याचा खराब फॉर्म अजूनही सुरूच आहे. टीम इंडियाचा मिस्टर ३६० डिग्री अशी ओळख असणारा सूर्यकुमार यादव देखील फार काही करू शकला नाही, अवघ्या ४ धावा केल्या.
हेही वाचा : IND vs NZ: “शिखर धवन कौतुकास…”, रवी शास्त्रींनी त्याच्या नेतृत्वावर केलं मोठ विधान
भारताची पडझड झाल्यानंतर मधल्याफळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने डाव सावरत शानदार अर्धशतक झळकवले. त्याने ७६ चेंडूत ८० धावांची दमदार खेळी केली. त्याला संजू सॅमसन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी मोलाची साथ देत टीम इंडियाला ३०० चा टप्पा गाठण्यास मदत केली. संजूने ३८ चेंडूत ३६ तर वॉशिंग्टन सुंदरने सुरेख फटकेबाजी करत १६ चेंडूत ३७ धावा करत भारताची धावसंख्या ३०६ पर्यत पोहचवली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या २४ षटकानंतर भारताला एकापाठोपाठ एक असे चार धक्के देत भारताला साडेतीनशे धावा करण्यापासून रोखले. टिम साऊदी आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर अॅडम मिल्ने याने एक गडी बाद करत त्या दोघांना साथ दिली.
न्यूझीलंडने हा सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. एवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडचण होणार असं वाटत असताना त्यांनी सहजरित्या पार केली.