बुधवारी, टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. ही मालिका सुरू होण्यापूर्वी किवी कर्णधार टॉम लॅथमने आपल्या संघातील प्रमुख कमकुवतपणा उघड केला आहे.
टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट आणि केन विल्यमसन यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे संघाला खूप त्रास होईल, असा त्याचा विश्वास आहे. मात्र, युवा खेळाडूंना संधी मिळाल्याने लॅथम खूश आहे.
लॅथमने मंगळवारी सामन्यापू्र्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, “ते (बोल्ट, साऊथी, विल्यमसन) संघात नाहीत आणि आम्हाला त्यांची उणीव भासेल.” दुसरीकडे, संघातील इतर खेळाडूंसाठी ही संधी आहे. संघातील सर्व खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे जे एक बोनस आहे. आता जबाबदारी घेण्याची त्यांची पाळी आहे. लॉकी फर्ग्युसनने भारतात भरपूर क्रिकेट खेळले हे आमचे भाग्य आहे.”
हेही वाचा – Australian Open 2023: अँडी मरेचा ५ तासांच्या मेहनतीनंतर शानदार विजय, थीम आणि मुगुरुझा बाहेर
सोधीने मंगळवारी नेटमध्ये सराव केला, पण तो नेहमीप्रमाणे कठीण गोलंदाजी करताना दिसला नाही. फिरकीचा चांगला सामना करणार खेळाडू असलेल्या लॅथमने जास्तीत जास्त वेळ नेटमध्ये घालवला. लॅथम म्हणाला, “दुर्दैवाने ईशला किरकोळ दुखापत झाली आहे. तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसला, तरी पुढच्या काही सामन्यांसाठी तो उपलब्ध असेल अशी आशा आहे.”
पाकिस्तानमध्ये २-१ ने शानदार विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडचा संघ भारतात वनडे मालिकेत खेळालयला आला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर या मालिकेला खूप महत्त्व आहे, असे लॅथमने सांगितले.
लॅथम म्हणाला, “आम्ही पाकिस्तानमध्ये खूप चांगले क्रिकेट खेळलो. काही खेळाडूंनी यापूर्वी कधीही पाकिस्तानचा दौरा केला नव्हता आणि तरीही मालिका जिंकणे खूप छान होते. येथे आम्ही शक्य तितके परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू. भारताची खेळपट्टी कदाचित पाकिस्तानपेक्षा थोडी चांगली असेल. जेव्हा आम्ही भारताविरुद्ध खेळतो तेव्हा ती स्पर्धात्मक मालिका असते.”
हेही वाचा – IND vs NZ 1st ODI: भारतासमोर आज न्यूझीलंडचे आव्हान; जाणून घ्या कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार सामना
विश्वचषकाच्या संदर्भात लॅथम म्हणाला, “विश्वचषक फार दूर नाही आणि त्याआधी या परिस्थितीत खेळण्याची ही शेवटची संधी आहे. आम्ही या परिस्थितीतून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करू. सुदैवाने, बहुतेक खेळाडू भारतीय परिस्थितीत खेळले आहेत.”
युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीसह भारतीय गोलंदाजांविरुद्ध आम्ही तयारी केली असल्याचे, लॅथमने सांगितले. त्यांच्या फलंदाजांनाही भारत दौऱ्यापूर्वी पाकिस्तानमध्ये खेळण्याचा फायदा होईल. विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आहे आणि त्याने गेल्या चार एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली आहेत.
लॅथमने सांगितले की भारताच्या स्टार फलंदाजासाठी संघाची एक योजना आहे. तो म्हणाला, “विराट खूप चांगले क्रिकेट खेळत आहे. तो चेंडू चांगलाच फटकावत असल्याचे दिसते. आपल्याला सर्वोत्तम योजना बनवण्याची गरज आहे. आम्ही त्याच्यासाठी शक्य तितके धावा काढणे कठीण करण्याचा प्रयत्न करू.”