IND vs NZ Rachin Ravindra reaction after win : बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडने टीम इंडियाचा ८ विकेट्सनी पराभव करत ३६ वर्षांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली. किवी संघाच्या या शानदार विजयात भारतीय वंशाचा खेळाडू रचिन रवींद्रचा मोलाचा वाटा होता. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने शतक झळकावून मोठी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात नाबाद ३९ धावा करत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. टीम इंडियाला पराभूत केल्यानंतर, त्याने स्वत: मुलाखतीत आपल्या चमकदार कामगिरीचे रहस्य काय आहे आणि त्याची आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जने यात कशी मदत केली? याबद्दल खुलासा केला.
टीम इंडियाला हरवण्यासाठी कशी केली होती तयारी?
न्यूझीलंडसाठी ऐतिहासिक सामना जिंकल्यानंतर मुलाखतीत रचिन रवींद्र सांगितेल की भारतात येऊन सराव केल्याचा फायदा झाला. कसोटी मालिकेपूर्वी आपण चेन्नईत येऊन सराव केल्याचा त्याने खुलासा केला. यासाठी चेन्नई सुपर किंग्जने त्याला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. लाल माती आणि काळ्या मातीच्या खेळपट्ट्यांवर रचिनने भरपूर फलंदाजी केली. त्याचवेळी सीएसकेने दिलेल्या वेगवेगळ्या गोलंदाजांविरुद्ध फलंदाजीचा सरावही केला. या मदतीसाठी त्यानी सीएसकेचे आभारही मानले.
भारतात येण्यापूर्वी न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने आणि अफगाणिस्तानविरुद्ध एक सामना खेळला होता. या सर्व मालिकेच्या तयारीसाठी रचिन रवींद्र फार पूर्वीच भारतात आला होता. त्याने सप्टेंबरमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये प्रशिक्षण सुरू केले होते. खेळपट्ट्यांच्या स्वरुप समजून घेण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी भारतात आला होता. बंगळुरू कसोटीत भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरल्यानंतर त्याच्या तयारीला यश आले आहे, असे म्हणता येईल.
रचिन ठरला न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार –
बंगळुरु कसोटीत पहिल्या डावात न्यूझीलंडने ७ विकेट्स गमावत २३३ धावा केल्या होत्या. यानंतर रचिनने शतक झळकावून भारतीय संघाला पुनरागमन करण्यापासून रोखले. तसेच ३५६ धावांची मोठी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या डावातही २ विकेट्स घेतल्यानंतर टीम इंडियाला दडपण आणत असताना त्याने नाबाद ३९ धावांची खेळी साकारून न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केला. ज्यामुळे न्यूझीलंडने ८ विकेट्सने विजय मिळवत ३६ वर्षांनी भारतात कसोटी विजय मिळवला.