IND vs NZ: टी २० विश्वचषकात टीम इंडियाच्या पराभवांनंतर भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी रोहित शर्माच्या जागी इतर कुणालातरी द्यावी अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. टी २० विश्वचषकात अर्धशतके झळकावूनही मोक्याच्या सामन्यांमध्ये रोहित शर्मा लवकर बाद झाला व इथूनच टीकेला सुरुवात झाली, अनेकांनी रोहित फॉर्म मध्ये नसल्याचे म्हणत त्याच्याजागी हार्दिक पांड्यावर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवावी असे मत व्यक्त केले आहे.याच पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आपले मत देऊन रोहितची उचलबांगडी करण्यास समर्थन दर्शवले आहे. रवी शास्त्री यांनी टीम इंडियाला इंग्लंडकडून संघबांधणीचे धडे घेण्याचाही सल्ला दिला आहे.
रवी शास्त्री म्हणाले की, टी २० क्रीडाप्रकारात नवनवीन प्रयोग करायला काहीच हरकत नाही, आपण नवीन कर्णधार नेमण्याचा नक्कीच विचार करू शकतो. एकच खेळाडू तिन्ही प्रकारात कर्णधार म्हणून खेळवणे हे सोप्पे नाही.” रोहित शर्मा सध्या टीम इंडियाच्या सर्व (टी २०, एकदिवसीय व टेस्ट) संघांचा कर्णधार आहे. यावेळी रवी शास्त्री यांनी इंग्लंडच्या संघाचे कौतुक करत त्यांनी ज्याप्रकारे संघ निवडला होता आणि व्हाईट बॉल क्रिकेटनुसार जी हुशारी दाखवली ते खरोखरच शिकण्यासारखे आहे. यंदाच्या विश्वचषकानंतर इंग्लंड हा ५० षटकांच्या व २० षटकांच्या विश्वचषकात विजेता ठरलेला संघ बनला आहे.
हे ही वाचा >> IND vs NZ: ‘यांना’ सारखा ब्रेक हवा, IPL चे ३ महिने काय.. राहुल द्रविडच्या विश्रांतीवर रवी शास्त्रींची सणसणीत टीका
रवी शास्त्री टीम इंडियाच्या संघ निवडीबाबत म्हणाले की, “आपण फॉरमॅटनुसार सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करायला हवी – मग ते T20 असो किंवा 50 षटकांचे क्रिकेट. आणि यामुळे जर काही वरिष्ठ खेळाडूंना बाहेर बसावे लागत असेल तरीही हरकत नाही. संघाला तरुण व निडर खेळाडूंची गरज आहे. भारताकडे खेळाडूंचा खजिना आहे आणि मला वाटते की आता या दौऱ्यापासून त्याची सुरुवात होऊ शकते. कारण जेव्हा तुम्ही या संघाकडे पाहता तेव्हा न्यूझीलंड दौऱ्याचा संघ हा एक नवीन, तरुण संघ म्हणून दिसतो. तुम्ही दोन वर्षांच्या कालावधीत या संघाला ओळखू शकता, तयार करू शकता आणि पुढे नेऊ शकता.”
हे ही वाचा >> हार्दिक पांड्या कर्णधार झाला तरी टीम इंडियावर संकट…इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं ‘हे’ कारण
सध्या रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल राहुल यांच्या अनुपस्थितीत टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यासाठी गेली आहे, यावेळी टी २० सामन्यांचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे तर एकदिवसीय मालिकांचे कर्णधारपद शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. या दौऱ्यात पांड्याने उत्तम कामगिरी केल्यास कदाचित खरोखरच रोहितच्या जागी त्याला कर्णधार बनवण्याचा विचार केला जाऊ शकतो. १८ नोव्हेंबरपासून टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड अशा मालिकांची सुरुवात होणार आहे. अमेझॉन प्राईमवर हे सामने आपल्याला पाहता येणार आहेत.