IND vs NZ Ravichandran Ashwin broke Shane Warne and Nathan Lyon records : टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने पुणे कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा पराक्रम केला आहे. तो नॅथन लायनचा विक्रम मोडत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा जगातील सातवा गोलंदाज ठरला आहे. याशिवाय अश्विनने महान शेन वॉर्नचा विक्रमही मोडला. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटीत त्याने तिसरी विकेट घेताच हा पराक्रम केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांवर गडगडला.
वास्तविक, अश्विनने या सामन्यात तिसरी विकेट घेताच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत सातव्या स्थानावर पोहोचला. या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नॅथन लायनला मागे टाकत हा पराक्रम केला आहे. या सामन्यात तिसरी विकेट घेत अश्विनच्या नावावर एकूण ५३१ विकेट्सची नोंद झाली आहे. नॅथन लायने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ५३० विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटी क्रिकेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज :
मुथय्या मुरलीधरन – ८००
शेन वॉर्न – ७०८
जेम्स अँडरसन – ७०४
अनिल कुंबळे – ६१९
स्टुअर्ट ब्रॉड – ६०४
ग्लेन मॅकग्रा – ५६३
रविचंद्रन अश्विन – ५३१
नॅथन लिऑन – ५३०
शेन वॉर्नचाही विक्रम मोडला –
यासह अश्विनने महान शेन वॉर्नचा मोठा विक्रमही मोडीत काढला. वास्तविक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक वेळा तीनपेक्षा जास्त विकेट्स घेण्याच्या बाबतीत शेन वॉर्न तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, त्याला मागे टाकत अश्विनने हा क्रमांक पटकावला आहे. अश्विनने या सामन्याद्वारे ८५ व्यांदा हा पराक्रम केला, तर वॉर्नने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ८४ वेळा ही कामगिरी केली होती. या यादीत पहिल्या क्रमांकावर महान मुथय्या मुरलीधरन आहे, ज्याने ११९ वेळा ही कामगिरी केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक तीनपेक्षा जास्त विकेट्स घेणारे गोलंदाज :
११९ – मुथय्या मुरलीधरन, श्रीलंका
९२ – जेम्स अँडरसन, इंग्लंड
८५ – रविचंद्रन अश्विन, भारत*
८४ – शेन वॉर्न, ऑस्ट्रेलिया
८३ – अनिल कुंबळे, भारत