IND vs NZ Rohit Sharma abusing Sarfaraz Khan Video Viral : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरु येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाज त्रिकुटाने चुकीचा सिद्ध केला. भारतीय संघ न्यूझीलंडच्या वेगवान आक्रमणापुढे गुडघे टेकताना दिसला. ज्यामुळे भारताचा संघ पहिल्या डावात अवघ्या ४६ धावांत गारद झाला. यानंतर न्यूझीलंडचा डाव सुरु झाल्यानंतर रोहित शर्मा भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणावर नाराज असल्याचे दिसले. यावेळी सर्फराझला शिवीगाळ करतानाही दिसला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी टेकले गुडघे –

बंगळुरू येथे खेळल्या जात असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब झाली. संपूर्ण संघ केवळ ४६ धावा करून बाद झाला. कर्णधार रोहित शर्माने स्वत: नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही परिस्थिती निर्माण झाली. काही वेळ खेळून न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा सामना करू शकणारा एकही फलंदाज संघात नव्हता. कर्णधार रोहित शर्मा स्वतः काही करू शकला नाही. न्यूझीलंडचे गोलंदाज प्रत्येक चेंडूवर विकेट घेण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत होते. एकामागून एक संघातील फलंदाज सातत्याने बाद होतच राहिले. पण जेव्हा न्यूझीलंडचा संघ फलंदाजीला आला तेव्हा खेळपट्टी बदलल्याप्रमाणे दिसत होती.

रोहित शर्मा सर्फराझवर संतापला –

टीम इंडियाने पहिल्या डावात केलेल्या ४६ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे फलंदाज टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे मैदानावर आले, तेव्हा त्यांनी पहिल्याच चेंडूपासून धावा काढण्यास सुरुवात केली. न्यूझीलंडची धावसंख्या २७ धावांवर असताना रोहित शर्मा खराब क्षेत्ररक्षणामुळे सर्फराझवर संतापताना दिसला. यावेळी रोहित शर्मा नक्की काय म्हणत होता, ते ऐकू येत नव्हते. कारण मैदानात खूप आवाज होता. परंतु रोहितच्या देहबोलीवरुन तो सर्फराझला शिवीगाळ करत असल्याचे जाणवत आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IND vs NZ : रोहित शर्माकडून पहिल्या डावात कुठे झाली सर्वात मोठी चूक? मोहम्मद कैफने स्पष्टच सांगितलं

पहिल्या डावात भारताला ४६ धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने चांगली फलंदाजी केली आणि पहिल्या डावात ३ बाद १८० धावा करून १३४ धावांची आघाडी घेतली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत रचिन रवींद्र २२ आणि डॅरिल मिशेल १४ धावांसह खेळत होते. भारताकडून आतापर्यंत रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. न्यूझीलंडसाठी कर्णधार टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली.

हेही वाचा – IND vs NZ : विराटने शून्यावर बाद होऊनही मोडला धोनीचा मोठा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

लॅथम १५ धावा करून कुलदीप यादवचा बळी ठरला. यानंतर विल यंगसह कॉनवेने डाव सांभाळला. जडेजाच्या चेंडूवर 33 धावा करून यंग बाद झाला. यानंतर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने शतकाकडे वाटचाल करणाऱ्या कॉनवेला बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले आणि कॉनवेला शतक झळकावण्यापासून रोखले. कॉनवे १०५ चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ९१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.