IND vs NZ Rohit Sharma embarrassing record as a captain : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ज्यामुळे न्यूझीलंड संघाने ३६ वर्षांनी भारतात पहिली कसोटी जिंकली आहे. भारताने न्यूझीलंडला विजयासाठी १०७ धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा त्यांनी सहज पाठलाग केला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो पूर्णपणे चुकीचे ठरला. भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या ४६ धावांत सर्वबाद झाला होता. येथूनच टीम इंडिया या सामन्यात मागे पडली. या पराभवासह रोहित शर्माला आणखी एक धक्का बसलाय. त्याच्या नावावर आता एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
रोहित शर्माच्या नावावर नोंदवला गेला लाजिरवाणा विक्रम –
न्यूझीलंडचा हा भारतीय भूमीवरील कसोटीतील तिसरा विजय आहे. या कसोटीपूर्वी न्यूझीलंडने ३६ वर्षांपूर्वी म्हणजे १९८८ मध्ये भारतीय भूमीवर कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर आता न्यूझीलंडला विजय मिळवला आहे. भारताने हा सामना हरताच रोहितच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. तो तिसरा भारतीय कर्णधार बनला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना गमावला आहे. रोहितच्या अगोदर दिलीप वेंगसरकर आणि मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी सामना पराभूत झाला आहे. न्यूझीलंड संघाने भारतीय भूमीवर ३८ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात तीन जिंकले आहेत आणि १७ कसोटी सामने गमावले आहेत. त्याचबरोबर १७ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. तसेटच रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने मायदेशात १४ पैकी ३ सामने गमावले आहेत.
भारताने दुसऱ्या डावात केले होते दमदार पुनरागमन –
भारतीय संघाने दुसऱ्या डावात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता. आघाडीचे सर्व फलंदाज लयीत दिसत होते. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी संघाला शानदार सुरुवात करून दिली होता. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. सर्फराझ खानने दमदार शतक झळकावत १५० धावांची खेळी साकारली. त्याच्याशिवाय ऋषभ पंतने दमदार फलंदाजी केली. त्याने ९९ धावा केल्या. रोहित-विराटनेही अर्धशतकी खेळी साकारली. अशा प्रकारे भारतीय संघाने दुसऱ्या डावात ४६२ धावा केल्या होत्या. ज्यामुळे भारताने १०७ धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग न्यूझीलंडने सहज केला.
मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध भारताने गमावलेले कसोटी सामने :
- १९६९ मध्ये नागपूर कसोटीत १६७ धावांनी पराभव
- १९८८ मध्ये मुंबई कसोटीत १३६ धावांनी पराभव
- २०२४ मध्ये बंगळुरू कसोटीत ८ गडी राखून पराभव
रचिन रवींद्रने न्यूझीलंडच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका –
न्यूझीलंडने पहिल्या डावात एकूण ४०२ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये किवी संघासाठी रचिन रवींद्रने सर्वात मोठी खेळी साकारली. त्याने शतक झळकावत डेव्हॉन कॉनवे आणि टीम साऊदीच्या साथीने न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. त्याच्याशिवाय या दोन्ही खेळाडूंनी अर्धशतके झळकावली. या खेळाडूंमुळेच न्यूझीलंड संघ चांगल्या स्थितीत पोहोचला. त्याचबरोबर दुसऱ्या डावातही नाबाद ३९ धावांची खेळी साकारली. ज्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.