IND vs NZ Rohit Sharma on 8th position most runs as opener : बंगळुरू कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात २ धावा करणारा भारतीय कसोटी कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या डावात लयीत दिसला आणि त्याने संघासाठी चांगली खेळीही खेळली. तो मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता, पण दुर्दैवाने तो एजाज पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. रोहित शर्माने बाद होण्यापूर्वी अर्धशतक पूर्ण केले. या खेळीच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आठवे स्थान पटकावले आहे. तसेच त्याने विराटच्या साथीने धावा करताना सौरव गांगुली आणि राहुल द्रविडचाही विक्रम मोडला.

रोहित शर्माने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत ६३ चेंडूत ५२ धावा केल्या. यादरम्यान त्याने एक षटकार आणि ८ चौकार लगावले. या खेळीच्या जोरावर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर कोहलीबरोबर भागीदारी करत गांगुली-द्रविडचाही विक्रम मोडला. त्याचबरोबर रोहितने तमिम इक्बाललाही मागे टाकले.

रोहित शर्माने तमिम इक्बालला मागे टाकले –

रोहित शर्माने बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात ५२ धावा केल्या आणि आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आला आहे. त्याने या क्रमांकावर असलेल्या तमीम इक्बालला मागे टाकले आणि आता तो नवव्या स्थानावर घसरला आहे. सलामीवीर म्हणून रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३६० डावांमध्ये १५२१४ धावा केल्या आहेत, तर तमिम इक्बालने ४५१ डावांमध्ये १५२१० धावा केल्या आहेत.

हेही वाचा – PAK vs ENG : बॅट उडाली, विकेट गेली, कॅप्टन गेला, सामनाही गेला…बेन स्टोक्स अनोख्या पद्धतीने झाला बाद; VIDEO व्हायरल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे सलामीवीर (डाव) :

१९२९८ धावा – सनथ जयसूर्या (५६३)
१८८६७ धावा – ख्रिस गेल (५०६)
१८७४४ धावा – डेव्हिड वॉर्नर (४६२)
१६९५० धावा – ग्रॅम स्मिथ (४२१)
१६१२० धावा – डेस्मन हेन्स (४३८)
१६११९ धावा – वीरेंद्र सेहवाग (४००)
१५३३५ धावा – सचिन तेंडुलकर (३४२)
१५२१४ धावा – रोहित शर्मा (३६०)
१५२१० धावा – तमिम इक्बाल (४५१)

रोहित-कोहलीने द्रविड-गांगुलीला टाकले मागे –

बंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी २३ धावांची भागीदारी झाली आणि त्यानंतर हिटमॅन बाद झाला. पण या भागीदारीच्या जोरावर या दोघांनी राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांचा भागीदारीचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांची भागीदारी करणारी रोहित-कोहली ही भारताची तिसरी जोडी ठरली आहे. या दोघांनी मिळून ७६२९ धावा केल्या आहेत, तर गांगुली आणि द्रविडने ७६२६ धावांची भागीदारी केली होती. या यादीत गांगुली आणि सचिन १२४०० धावांच्या भागीदारीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचा – IND vs NZ : रोहित शर्मा दुसऱ्या डावात ठरला दुर्दैवी! विचित्र पद्धतीने बाद झाल्याने निराश झाल्याचा VIDEO व्हायरल

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करणारे खेळाडू :

१२४०० धावा – गांगुली/सचिन
११०३७ धावा – द्रविड/सचिन
७६२९ धावा – रोहित/कोहली
७६२६ धावा – गांगुली/द्रविड
७१९९ धावा – गंभीर/सेहवाग
६९८४ धावा – रोहित/धवन