न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने २-०अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुलच्या शानदार खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळाला. विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा खेळाडूंची कामगिरी आणि बेंच-स्ट्रेंथबद्दल मोकळेपणाने बोलला.

सामन्यानंतर रोहित म्हणाला, ”कठीण परिस्थितीत आम्ही चांगली कामगिरी केली, न्यूझीलंडचा संघ शानदार आहे. सामन्यात एका विकेटची चर्चा होती, ज्यामुळे आम्हाला गती मिळू शकली असती. आमची बेंच स्ट्रेंथ खूप मजबूत आहे, नवीन खेळाडू सातत्याने क्रिकेट खेळत आहेत.”

रोहित शर्मा म्हणाला, ”कर्णधार म्हणून माझे काम हे असेल की नवीन खेळाडू जेव्हाही खेळायला येतात, तेव्हा त्यांना नेहमीच आरामदायक वाटेल. इतर बाह्य गोष्टींची चिंता न करता खेळाडूंना ते स्वातंत्र्य दिले जावे, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे मैदानावर येताच त्यांनी फक्त खेळाचा विचार करावा.”

हेही वाचा – VIDEO: भारतीय गोलंदाजानं डिव्हिलियर्सला ‘अपमानास्पद’ पद्धतीनं म्हटलं धन्यवाद; खवळलेले नेटकरी म्हणाले, ‘‘तुझी लायकी…”

विशेष म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडलेला विराट कोहली या मालिकेत खेळत नाहीये, अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळत आहे. व्यंकटेश अय्यरने पहिल्या टी-२० सामन्यामध्ये पदार्पण केले आणि हर्षल पटेलने दुसऱ्या सामन्यात पदार्पण केले. दुसऱ्या सामन्यात हर्षलला सामनावीर पुरस्कार मिळाला.

असा रंगला दुसरा सामना…

रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना जिंकत तीन सामन्यांची मालिका खिशात टाकली आहे. रांचीमध्ये रंगलेल्या या सामन्यात रोहितने पुन्हा टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दमदार सुरुवात केलेल्या न्यूझीलंडचा संघ शेवटच्या षटकात धावा जमवण्यात अपयशी ठरला. २० षटकात न्यूझीलंडने ६ बाद १५३ धावा केल्या. भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने २५ धावांत २ बळी घेत उत्तम पदार्पण केले. शेवटच्या ३ षटकात न्यूझीलंडला १५ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली. त्यांनी केलेल्या ११७ धावांच्या भागीदारीमुळे भारताला १७.२ षटकातच ७ गडी राखून हा विजय मिळाला. हर्षलला सामनावीर पुरस्कार मिळाला. तिसरा आणि अंतिम सामना २१ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे.

Story img Loader