Sarfaraz Khan praised by Sunil Gavaskar : देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केलेल्या सर्फराझ खानला टीम इंडियात पदार्पणासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. सर्फराझ खानने आतापर्यंत केवळ चार कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, त्याने न्यूझीलंडविरुद्ध १५० धावांची खेळी साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याआधी सर्फराझला त्याच्या वजनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याचं वजन हा अनेकवेळा चर्चेचा विषय ठरला होता. आता याबाबत भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सर्फराझचे कौतुक करताना, भारताच्या निवडसमितीला फटकारले आहे. गावस्कर म्हणाले, सर्फराझने ज्या प्रकारे दमदार फलंदाजी करत पुनरागमन केले आहे, ते त्याच्या कंबरेपेक्षा नक्कीच मोठे आहे. यदा इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचे अनेक महत्त्वाचे फलंदाज उपलब्ध नव्हते. त्यावेळ सर्फराझला पदार्पणाची संधी मिळाली. सर्फराजने तीन कसोटी सामने खेळले आणि तीन अर्धशतके झळकावली, मात्र त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याला वगळण्यात आले. शुबमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे सर्फराझला भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली.

सुनील गावसकर यांनी स्पोर्ट्स स्टारच्या स्तंभात लिहिले की, ‘सर्फराझने ज्या प्रकारे मैदानावर बॅटने पुनरागमन केले, हे त्याच्या कंबरेपेक्षा नक्कीच मोठे आहे. दुर्दैवाने, भारतीय निवडसमितीत बरेच असे निर्णय घेणारे लोक होते, ज्यांच्यामुळे सर्फराझला दीर्घकाळ टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नाही, तरीही तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करत राहिला. हे घडले कारण निवडसमितीत असे काही लोक होते, ज्यांना वाटत होते की त्याची कंबर सडपातळ नाही. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी योग्य नाही.’

ऋषभ पंतचे उदाहरण देताना गावस्कर म्हणाले की, ‘तोही सडपातळ क्रिकेटर नाही. गावसकर म्हणाले, ‘ऋषभ पंत हा आणखी एक खेळाडू आहे, ज्याची कंबर सडपातळ नाही, पण तो किती प्रभावशाली खेळाडू आहे. इथे आपण हे विसरू नये की तो दिवसभर यष्टीरक्षणही करतो. त्यामुळे यो-यो टेस्टकडे दुर्लक्ष करून, खेळाडू मानसिकदृष्ट्या किती खंबीर आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे.’