IND vs NZ Sarfraz Khan urging Rohit Sharma to take DRS video viral : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी लंच ब्रेकपूर्वी सर्फराझ खानच्या जिद्दीने भारताला विल यंगची महत्त्वाची विकेट मिळवून दिली. लंच ब्रेकपूर्वी न्यूझीलंडने २ बाद ९२ धावा केल्या होत्या आणि दोन्ही विकेट अश्विनच्या खात्यात गेल्या. आता सर्फराझ खान कर्णधार रोहित शर्माला डीआरएस घ्यायला सांगतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यूझीलंडच्या डावातील २४ वे षटक टाकण्यासाठी रविचंद्रन अश्विन आला होता. अश्विनने शेवटचा चेंडू टाकला. चेंडू लेगस्टंपच्या बाहेर होता. तरीही विल यंगने या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न फसला आणि चेडूं बॅटवर पूर्णपणे व्यवस्थित घेता आला नाही. जो नंतर यष्टीरक्षक ऋषभ पंतने पकडला. पण चेंडूने बॅटची इतकी हलकी धार घेतली की फारच कमी आवाज झाला. यानंतर भारतीय खेळाडूंनी अपील केली. मात्र, यामध्ये जोर नव्हता. त्यामुळे अंपायरने विल यंगला आऊट दिले नाही. मात्र, सर्फराझ खान शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करत होता आणि त्याला खात्री होती की चेंडू विल यंगच्या बॅटला लागला आहे.

सर्फराजने डीआरएससाठी रोहितकडे धरला आग्रह –

रविचंद्रन अश्विननेही अपील केले पण तो पूर्णपणे आत्मविश्वासात नव्हता. दरम्यान अंपायरने आऊट देण्यास नकार दिला. सरफराज कर्णधार रोहित शर्माकडे गेला आणि आग्रह करू लागला. त्याच्या मागे क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराट कोहलीचीही त्याला साथ लाभली. या दोघांचा आग्रह पाहून रोहित शर्मालाही नकार देता आला नाही. 5 सेकंद शिल्लक असताना, त्याने निर्णय डीआरएस घेण्याचे हाताने संकेत दिले.

हेही वाचा – Sikandar Raza : सिकंदर रझाने मोडला विराट-सूर्याचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, आयपीएल लिलावापूर्वी वेधले फ्रँचाइजींचे लक्ष

चेंडू विल यंगच्या ग्लोव्हजला लागला होता –

चाहत्यांसोबतच टीम इंडियाचे खेळाडूही श्वास रोखून स्क्रीनकडे बघत होते. रिप्लेमध्ये काहीही स्पष्टपणे समजले नाही. यानंतर स्निकोमीटर आला. जेव्हा चेंडू विल यंगच्या ग्लोव्हजजवळ होता तेव्हा स्नीकोमीटरने हालचाल दिसली. त्यानंत टीम इंडियासह संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यानंतर तिसऱ्या पंचाच्या आदेशानुसार मैदानावरील पंचांनी आपला निर्णय बदलला आणि विल यंगला आऊट दिले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IND vs NZ : ‘तो तर अजून…’, शोएब अख्तरने विराटच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारताच वीरेंद्र सेहवागने दिले चोख प्रत्युत्तर

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात ४८ षटकानंतर ३ गडी गमावून १४८ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडसाठी डेव्हॉन कॉन्वेने सर्वांधिक ७६ धावांचे योगदान दिले. कर्णधार लॅथम (१५) आणि विल यंग (१८) स्वस्तात बाद झाले. या तिघांनाही रविचंद्रन अश्विनने तंबूचा रस्ता दाखवला. सध्या रचिन रवींद्र (२७) आणि डॅरिल मिचेल (५) खेळत आहेत.