गेल्या दीड महिन्यापासून टीम इंडिया सातत्याने जिंकत आली आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये लीग फेरीत एकही सामना न गमावलेल्या भारतानं सलग ९ सामने जिंकत नवा विक्रम केला आहे. रविवारी नेदरलँड्सला १६० धावांनी नमवत टीम इंडियानं तब्बल १८ गुणांसह दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता बुधवारी, अर्थात १५ नोव्हेंबर रोजी टीम इंडियाची गाठ पुन्हा एकदा न्यूझीलंडशी पडणार आहे. लीग फेरीत भारतानं न्यूझीलंडला पराभूत केल्यामुळे भारतीय संघच या सामन्यात फेव्हरेट मानला जात आहे. पण मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर आकड्यांचं गणित भारताच्या बाजूने आहे की नाही? हेही पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे!
लीग फेरीत २२ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतानं चार विकेट्स राखून विजय मिळवला होता. न्यूझीलंडच्या २७३ धावांचा पाठलाग करताना भारतानं ६ गड्यांच्या मोबदल्यात ४८व्या षटकातच विजय मिळवला होता. या सामन्यात डॅरिल मिचेलच्या तडाखेबाज १३० धावा आणि रचिन रविंद्रच्या ७५ धावा वगळता न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांना छाप पाडता आली नव्हती. तर दुसरीकडे मोहम्मद शमीनं याच सामन्यात पाच विकेट्स घेत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं होतं. मात्र, हा सामना झालेल्या धरमशालापेक्षा मुंबईच्या वानखेडेची परिस्थिती व आकडेवारीही वेगळी आहे.
IND vs NED: विराट कोहलीच्या विकेटवर अनुष्काचा विश्वास बसेना, Video व्हायरल!
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यामुळे वानखेडे स्टेडियमवर चेंडू स्विंग होतो. शिवाय, इथे फिरकीपटूंनाही चांगली मदत मिळते. चेंडू उसळीही घेतो. त्यामुळे दोन्ही बाजूच्या फलंदाजांसाठी वानखेडेचा पेपर कठीण ठरू शकतो. मात्र, टीम इंडियाच्या फलंदाजीचा यंदाच्या विश्वचषकातला फॉर्म पाहाता त्यांच्यावर भारताची मोठी भिस्त असेल. भारतानं जिंकलेल्या २०११ च्या विश्वचषकाचा अंतिम सामना याच वानखेडे स्टेडियमवर झाला होता.
काय सांगते वानखेडेची आकडेवारी?
वानखेडे स्टेडियमवर १९८७ सालापासून आत्तापर्यंत एकूण २७ सामने खेळवले गेले. त्यातील १९ सामने टीम इंडियाचे होते. त्यातल्या १० सामन्यांत भारतानं विजय मिळवला असला, तरी ९ सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. वानखेडेवर झालेल्या एकूण सामन्यांपैकी १३ सामने आधी बॅटिंग करणाऱ्या टीमनं जिंकले असून १४ सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानं जिंकले आहेत.
सर्वाधिक धावसंख्या – दक्षिण आफ्रिकेनं २०१५मध्ये भारताविरुद्ध फटकावलेल्या ४८४ धावा या स्टेडियमवरच्या आत्तापर्यंतच्या सर्वोच्च धावा ठरल्या आहेत. पण भारताला या मैदानावर आत्तापर्यंत ३००हून अधिक धावसंख्या गाठता आलेली नाही.
सर्वात कमी धावसंख्या – याच वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्धच श्रीलंकेनं वानखेडेवरची सर्वात कमी ५५ ही धावसंख्या नोंदवली आहे. मोहम्मद शमीनं त्या सामन्यात ५ बळी घेत श्रीलंकेच्या फलंदाजांची भंबेरी उडवून दिली.
सर्वाधिक धावा – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक धावा नोंद आहेत. ११ सामन्यांमध्ये सचिननं वानखेडेवर ४५५ धावा केल्या आहेत.
सर्वाधिक विकेट्स – भारताचा माजी जलदगती गोलंदाज व्यंकटेश प्रसादनं वानखेडेवर सर्वाधिक १५ बळी घेतले आहेत. त्यापाठोपाठ अनिल कुंबळेनं इथे १२ बळी घेतले आहेत.
सर्वोच्च भागीदारी – डेविड वॉर्नर व एरॉन फिंचनं ऑस्ट्रेलियासाठी या मैदानावर २०२०मध्ये भारताविरोधात २५८ धावांची विक्रमी भागीदारी केली आहे. त्यापाठोपाठ विराट कोहली व सुरेश रैनानं इंग्लंडविरोधात २०११मध्ये सहाव्या विकेटसाठी या मैदानावर १३१ धावांची भागीदारी केली आहे.
सर्वाधिक वैयक्तिक धावा – वानखेडेवर दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डि कॉकनं एका सामन्यातल्या सर्वाधिक १७४ धावा नोंदवल्या आहेत. त्याच्याव्यतिरिक्त आजतागायत वानखेडेवर विराट कोहली (१२१), सचिन तेंडुलकर (११४) व मोहम्मद अझरुद्दीन (१०८) या तीनच फलंदाजांना शतक झळकावण्यात यश आलं आहे.
सर्वाधिक वैयक्तिक बळी – मुरली कार्तिकनं २००७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक ६ बळी घेण्याचा विक्रम केला आहे.