एकीकडे अवघा भारत सेमीफायनलमधील भारताच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष करत असताना दुसरीकडे या सेमीफायनल सामन्याची दुसरी धक्कादायक बाजू समोर आली आहे. बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनलची तब्बल ७० टक्के तिकिटं काळ्या बाजारात विकली गेल्याचा धक्कादायक तपशील समोर आला असून पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अठकही केली आहे. फ्री प्रेस जर्नलनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यामुळे सेमीफायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार झाल्यामुळे हजारो सामान्य क्रिकेट चाहते प्रत्यक्ष स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामना पाहण्याच्या आनंदाला मुकले आहेत.
नेमकं घडलं काय?
मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केल्यानंतर तिकिटांचा काळा बाजार करण्याच्या या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. रोशन गुरुबक्षानी व आकाश कोठारी या नावाच्या दोन व्यक्तींना मुंबई पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या माध्यमातून Ind vs NZ सेमीफायनलच्या तिकिटांचा काळा बाजार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. फ्री प्रेस जर्नलनं दिलेल्या वृत्तानुसार आकाश व रोशन हे ‘टीम इन्नोव्हेशन’ या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसाठी काम करतात. ही कंपनी म्युझिक फेस्टिव्हल, सांस्कृतिक कार्यक्रम व स्पोर्ट्स इव्हेंट्सचं आयोजन करते.
रोशन व आकाशच्या अटकेनंतर पोलिसांनी टीम इन्नोव्हेशनचा सहसंस्थापक व ऑनलाई तिकीट विक्री करणारी आणखी एक कंपनी विंक एंटरटेन्मेंट यांच्याही चौकशीची तयारी केली आहे. बीसीसीआयच्या भारतातील सामन्यांच्या तिकीट विक्रीसाठीचे पार्टनर म्हणून या कंपन्यांना काम दिलं जातं असंही सांगितलं जात आहे.
Video: “ना कोहली, ना शमी.. सेमीफायनलचा खरा हिरो…”, इंग्लंडच्या माजी कर्णधारानं दिलं ‘या’ खेळाडूला श्रेय!
कसा झाला तिकिटांचा काळा बाजार?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सामन्याची जवळपास ७० टक्के तिकिटं काळ्या बाजारात किमान १४ पट अधिक किंमतीला, म्हणजेच जवळपास १ लाख रुपयांना विकली गेली. रोशन व आकाश या दोघांकडे तिकीट विक्री करणाऱ्या कंपन्यांचे लॉगइन डिटेल्स होते. या माध्यमातून त्यांनी सामन्याची ७० टक्के तिकिटं ब्लॉक केली आणि नंतर त्या तिकिटांची काळ्या बाजारात विक्री केली. या दोघांच्या मोबाईल, लॅपटॉप व इतर गॅजेट्सची तपासणी केल्यानंतर त्यांनी मुंबई, पुणे, हैदराबाद व गोव्यातील अनेक मोठ्या कार्यक्रमांच्या तिकिटांचा अशाच प्रकारे काळा बाजार केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आहे.
३० वर्षीय आकाश कोठारी ऑनलाईन तिकिटांची विक्री करायचा तर रोशन गुरुबक्षानी ही तिकीटं उपलब्ध करून द्यायचा. काळ्या बाजारात जवळपास लाखभर रुपयांना विकल्या जाणाऱ्या या तिकिटांवर छापील किंमत मात्र २५०० रुपये इतकी होती. या सर्व प्रकरणात एक मोठं रॅकेट काम करत असून अशा मोठ्या इव्हेंट्सच्या तिकिटांचा असाच काळा बाजार होत असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दिशेनं पोलिसांचा तपास चालू आहे.