India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील पहिला उपांत्य सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार असून सामन्याला दुपारी २ वाजता सुरुवात होणार आहे. आतापर्यंत भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही, आता भारतीय संघाला उपांत्य फेरीतील सामना जिंकून थेट अंतिम फेरीत धडक मारायची आहे.
पण आता टीम इंडियासमोर बाद फेरीतील सामन्यांमध्ये भारतीय संघावर नेहमीच वर्चस्व गाजवलेल्या न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघाला हे आव्हान पेलायचे असेल आणि अंतिम फेरी गाठायची असेल, तर त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांना धावा कराव्या लागतील. दुसरीकडे, विराट कोहलीच्या बाद फेरीतील सामन्यांच्या आकडेवारीने आता संघाची चिंता थोडी वाढवली आहे.
बाद फेरीतील सामन्यात विराटची बॅट शांत –
आतापर्यंत विराट कोहलीसाठी विश्वचषक चांगला राहिला असून तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत ५९५ धावा झाल्या आहेत. या काळात त्याने २ शतकेही झळकावली आहेत. पण त्याचे बाद फेरीची आकडेवारी पाहता संघाचे चिंता थोडी वाढवणारे आहे. आतापर्यंत विश्वचषकाच्या इतिहासात विराटने तीन उपांत्य फेरीचे सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामन्यांमध्ये त्याची बॅट शांत राहिली आहे.
बाद फेरीतील विराट कोहलीची आकडेवारी –
२०११ मध्ये विराटने पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनल सामना खेळला होता, या सामन्यात त्याने केवळ ९ धावा केल्या होत्या. यानंतर, २०१५ मध्ये, विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल सामना खेळला ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून फक्त एक धाव आली होती. तसेच २०१९ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनल सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये विराटने फक्त एक धाव काढली होती.
उपांत्य फेरीत वेगवान गोलंदाज देतात त्रास –
या तीनही उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये विराट कोहलीला केवळ वेगवान गोलंदाजांनीच बाद केल्याचे पाहायला मिळते. आता विश्वचषक २०२३ चा उपांत्य फेरीचा सामना वानखेडेच्या खेळपट्टीवर खेळवला जात असून या खेळपट्टीवर नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांना खूप मदत करतो. त्यामुळे विराट कोहलीला आपली जुनी आकडेवारी विसरून सुरुवातीच्या षटकांमध्ये सावधपणे खेळावे लागणार आहे. विराटने वेगवान गोलंदाजांना, विशेषत: बोल्टची सुरुवातीची षटके सावधपणे खेळून काढली, तर तो नक्कीच मोठी खेळी खेळेल.