टी २० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं १० गडी राखून मात दिल्यानंतर न्यूझीलंडनेही पराभूत केलं आहे. यामुळे उपांत्य फेरीच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. भारताचा तिसरा सामना अफगाणिस्तानशी आहे. या सामन्यात काही उलटफेर झाल्यास भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात येणार आहेत. वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर ३ टी २० आणि २ कसोटी सामने खेळण्यास जाणार आहे. या मालिकेसाठी संघात काही बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्माला टी २० संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहेत. त्याचबरोबर हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार यांना संघातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

फिटनेस आणि खराब फॉर्ममुळे पंड्या आणि भुवनेश्वर कुमारला संघातून डच्चू दिला जाईल, असं वृत्त पीटीआयने दिलं आहे. या दोघांच्या जागेवर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायवाड आणि आवेश खानला संधी मिळण्याची शक्यता आहे. ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवली आहे. तर आवेश खानने सर्वाधिक गडी बाद केले आहेत.

वर्ल्डकपनंतर विराटला बसणार ‘मोठा’ धक्का? आधी टी-२० संघाचं कप्तानपद सोडलं आणि आता…

टी २० वर्ल्डकपमध्ये भारताच्या कामगिरीसाठी हार्दिक पंड्याही जबाबदार आहे. गोलंदाजी न केल्याने त्याचा फटका भारतीय संघाला बसला. पाकिस्तान विरुद्धचा सामना भारताने १० विकेट्सने गमावला. या सामन्यात पंड्याच्या खांद्याला पुन्हा एकदा दुखापत झाली होती. मात्र जखम गंभीर नसल्याने न्यूझीलंडविरुद्ध दोन षटकं टाकली. मात्र त्याला एकही विकेट मिळवता आला नाही. तर आयपीएल २०२१ स्पर्धेतही पंड्याची कामगिरी निराशाजनक राहिली. लीगमध्ये त्याने एकही षटक टाकलं नाही. दुसरीकडे भुवनेश्वर कुमार गेल्या वर्षभरापासून खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने ३ षटकात २५ धावा दिल्या. मात्र एकही गडी बाद करता आला नाही.

Story img Loader