भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना माऊंट मौनगानुई येथे खेळवला जात आहे. या सामन्यात चांगल्या लयीत धावणारा श्रेयस अय्यर हिट विकेटवर बाद झाला. तो बाद झाला तेव्हा त्याने नऊ चेंडूंत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १३ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने ६ बाद १९१ धावा केल्या आणि न्यूझीलंडला १९२ धावांचे लक्ष्य दिले.
बॅकफूटवर लॉकी फर्ग्युसनचा चेंडू खेळण्याच्या नादता त्याचा पाय मागे असलेल्या यष्टीला लागला. मात्र, त्यानंतर श्रेयसला कळले नाही आणि धाव घेण्यासाठी त्याने धाव घेतली. परंतु विरोधी संघाच्या खेळाडूंनी जल्लोष केला, तेव्हा त्याला हे लक्षात आले. त्यानंतर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याला जड अंत:करणाने पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये हिट विकेट होणारा श्रेयस हा २५ वा फलंदाज आहे. तसेच, अशा प्रकारे बाद होणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी हर्षल पटेल, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या हे असे बाद झाले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या चेंडूवर हार्दिक अशा पद्धतीने बाद झाला होता. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून हिट विकेट होणारा राहुल हा पहिला फलंदाज आहे. २०१८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध जीवन मेंडिसच्या चेंडूवर तो अशाप्रकारे बाद झाला होता. तसेच लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर न्यूझीलंडविरुद्ध हर्षल पटेलही बाद झाला होता.
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हिट विकेट्स झालेले फलंदाज:
अॅश्टन अगर (ऑस्ट्रेलिया), अमजद जावेद (यूएई), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), दिनेश चंडीमल (श्रीलंका), मार्क चॅपमन (न्यूझीलंड), दामियो कुआना (एमओझेड), एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) , जी फॅटॉरस (जीएरसी), आरोन फिंच (ऑस्ट्रेलिया), जेन ग्रीन (नामिबिया), गॅरेथ जेम्स हॉपकिन्स (न्यूझीलंड), कॅलम स्कॉट मॅकलिओड (स्कॉटलंड), कुसल मेंडिस (श्रीलंका), मिसबाह-उल-हक (पाक), मोहम्मद हफीझ (पाक), डिडिएर डिकुबविमाना (आरडब्ल्यू), कॉलिन्स ओमोंडी अबुया (केनिया), डेव्हिड ओलुच ओबुया (केनिया), हर्षल पटेल (भारत), केएल राहुल (भारत), हेडन रशीडी वॉल्श (यूएसए), सुदेश विक्रमसेकेरा (सीझेके-आर) आणि श्रेयस अय्यर (भारत).