Ravi Shastri Slams Rahul Dravid: टी २० विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर आता १८ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. न्यूझीलंडमधील तीन सामन्यांच्या मालिकांसाठी संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्माच्या जागी टी २० टीमचे कर्णधारपद हार्दिक पांड्याला तर एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचे कर्णधारपद शिखर धवन याच्याकडे सोपवण्यात आले आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरही राहुल द्रविडच्या ऐवजी वीवीएस लक्ष्मण यांची वर्णी लागली आहे. या तिन्ही प्रमुख बदलांसाठी टी २० विश्वासचषकातील अपयश कारण नसल्याचे बीसीसीआयकडून पूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. राहुल, रोहित व कोहलीला विश्रांतीसाठी संघात हे फेरबदल करण्यात आले आहेत. मात्र या बदलांवरून माजी प्रशिक्षक रवी शास्त्री मात्र फारच नाराज झाले आहेत.

रवी शास्त्री, प्रशिक्षक असताना, कोणत्याही मालिकेच्या दरम्यान संघ खेळत असला तरीही शास्त्री संपूर्ण वेळ सक्रिय होते. द्रविडच्या विश्रांती ब्रेकमुळे प्रशिक्षक-खेळाडूच्या बॉण्डिंगवर परिणाम होतो असे त्यांचे मत आहे. खेळाडूंवर तणाव पडू नये म्हणून अलीकडे त्यांना काही दौऱ्यांमध्ये ब्रेक दिला जातो मात्र हाच नियम प्रशिक्षकांच्या बाबत लागू करणे हे योग्य नाही असेही शास्त्री म्हणाले आहेत.

हे ही वाचा >> मोहम्मद शमीला उचलून.. भारत हरताच शोएब अख्तरने स्वतः टाकली होती वादाची ठिणगी, ‘हा’ Video पाहा

शास्त्री यांनी द्रविडचे नाव न घेता वेलिंग्टनमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी २० सामन्यापूर्वी शास्त्री यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की, “माझा विश्रांतीचे ब्रेक या संकल्पनेवर विश्वास नाही. मला माझा संघ समजून घ्यायचा आहे, मला माझ्या खेळाडूंना समजून घ्यायचे आहे आणि मला त्या संघाला नियंत्रणात ठेवायचे आहे. प्रामाणिकपणे मला हाच प्रश्न पडतो की यांना इतक्या ‘ब्रेक्स’ची काय गरज आहे? तुम्हाला तुमचे आयपीएलचे 3 महिने, प्रशिक्षक म्हणून विश्रांती घेण्यासाठी पुरेसे वाटत नाहीत का?

हे ही वाचा >> हार्दिक पांड्या कर्णधार झाला तरी टीम इंडियावर संकट…इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं ‘हे’ कारण

रवी शास्त्री पुढे खेळाडूंच्याबाबत म्हणाले की, ‘आपण फॉरमॅटनुसार सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करायला हवी – मग ते T20 असो किंवा 50 षटकांचे क्रिकेट. आणि यामुळे जर काही वरिष्ठ खेळाडूंना बाहेर बसावे लागत असेल तरीही हरकत नाही. संघाला तरुण व निडर खेळाडूंची गरज आहे. भारताकडे खेळाडूंचा खजिना आहे आणि मला वाटते की आता या दौऱ्यापासून त्याची सुरुवात होऊ शकते. कारण जेव्हा तुम्ही या संघाकडे पाहता तेव्हा न्यूझीलंड दौऱ्याचा संघ हा एक नवीन, तरुण संघ म्हणून दिसतो. तुम्ही दोन वर्षांच्या कालावधीत या संघाला ओळखू शकता, तयार करू शकता आणि पुढे नेऊ शकता.”

Story img Loader