IND vs NZ Team India Test squad announced : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेदरम्यान निवडलेल्या खेळाडूंनाही या मालिकेत संधी देण्यात आली आहे. फक्त एक मोठा बदल दिसत आहे. वास्तविक, या मालिकेपूर्वी कोणत्याही खेळाडूकडे टीम इंडियाचे उपकर्णधारपद नव्हते, मात्र न्यूझीलंड मालिकेसाठी नव्या उपकर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराह भारताचा उपकर्णधार असून भारतीय संघाचे कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या हाती आहे.
बीसीसीआयने १५ सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये अनुभवी खेळाडूंसोबतच नवीन खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. टीम इंडियाने अलीकडेच कसोटी मालिकेत बांगलादेशचा पराभव केला होता. आता तोच संघ न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू, पुणे आणि मुंबई येथे कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यासह चार राखीव खेळाडूंची पण निवड करण्यात आली आहे.
चार राखीव खेळाडू जाहीर –
भारतीय संघाच्या घोषणेसोबतच बीसीसीआयने इतर चार राखीव खेळाडूंचाही समावेश केला आहे. नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मयंक यादव आणि प्रसिध कृष्णा हे राखीव खेळाडू टीम इंडियासोबत असणार आहेत. नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा आणि मयंक यादव हे भारतीय कसोटी संघाकडून अद्याप खेळलेले नाहीत. प्रसिध कृष्णा भारताकडून कसोटी खेळला असला तरी बीसीसीआयने राखीव खेळाडूमध्ये तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. यावरून या मालिकेसोबतच ऑस्ट्रेलिया दौऱ्याचीही तयारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा – ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताची वाढवली डोकेदुखी, टीम इंडिया कशी पोहोचणार उपांत्य फेरीत?
टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची –
या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून बंगळुरू येथे खेळला जाणार आहे. दुसरा सामना पुण्यात होणार आहे. हा सामना २४ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. मालिकेतील तिसरा सामना १ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ज्याचे आयोजन मुंबईत करण्यात येणार आहे. भारतीय संघासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. वास्तविक, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे आणि भारतीय संघाला आपले स्थान कायम राखायचे आहे. त्यामुळे ही मालिका खूपच महत्त्वाची आहे
हेही वाचा – Manu Bhaker : मनू भाकेरच्या रॅम्प वॉकसमोर मॉडेल्सही पडतील फिक्या, लॅक्मे फॅशन वीकमधील VIDEO होतोय व्हायरल
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.