IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. रविवारी मुंबईत झालेल्या अखेरच्या कसोटीत भारताचा २५ धावांनी पराभव झाला. फिरकीपटू एजाज पटेलने मुंबई कसोटीत ११ विकेट्स घेत ऐतिहासिक कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. भारताने पहिल्यांदाच घरच्या मैदानावर तीन सामन्यांची कसोटी मालिका ३-० ने गमावली आहे. या ऐतिहासिक मालिका विजयानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने संघाचे शानदार कामगिरीचे गुपित सांगितले.
खेळाडूंनी परिस्थितीशी जुळवून घेतले ते कौतुकास्पद –
भारताच्या क्लीन स्वीपनं दिल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, तीन आठवड्यांपूर्वी आम्ही भारतात फक्त विजयाचे स्वप्न घेऊन आलो होतो, जे आज साकार झाले आहे. कारण त्यांनी प्रथमच टीम इंडियाला भारतात क्लीन स्वीप केले. टॉम लॅथम म्हणाला, “अशा प्रकारे कसोटी मालिका जिंकून खूप आनंद झाला आहे. आमच्या खेळाडूंनी गेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली, त्याचेच आज हे फळ आहे. खेळाडूंनी ज्या प्रकारे परिस्थितीशी जुळवून घेतले ते कौतुकास्पद आहे.”
हे सांघिक मेहनतीचे यश –
न्यूझीलंडचा कर्णधार पुढे म्हणाला, “वेगवान गोलंदाजांनी पण बंगळुरू कसोटीत चांगली कामगिरी केली होती. वेगवेगळ्या खेळाडूंनी वेगवेगळ्या वेळी चांगली कामगिरी केली, हेच सांघिक खेळाचे सौंदर्य आहे. मिशेल सँटरने गेल्या आठवड्यात आपली छाप सोडली होती. आता मुंबई कसोटीत एजाज पटेलने कमाल केली. त्याला मुंबईत गोलंदाजी करायला आवडते. हे सांघिक मेहनतीचे यश आहे आणि मला आमच्या खेळाडूंचा खूप अभिमान आहे. आम्ही बॅटने थोडे अधिक आक्रमक होतो. आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल थोडेसे समजून घेतले आणि आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला.”
हेही वाचा – Rishabh Pant : ऋषभ पंत आऊट की नॉट आऊट? VIDEO व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण
u
u
टॉम लॅथम म्हणाला, “काही वेळा नाणेफकीचा कौल आमच्या बाजूने लागला नाही, जे या परिस्थितीत महत्त्वाचे होते. आम्ही धावफलकावर पुरेशा धावा लावल्याचा आम्हाला विश्वास होता. आज सकाळी मुंबईत आम्ही चांगली गोलंदाजी केली. जेव्हा तुम्ही कठीण विकेटवर धावसंख्येचा पाठलाग करत असता, तेव्हा धावफलकावर पुरेशा धावा असणे आवश्यक असते आणि आमच्या धावसंख्येवर विश्वास होता. जेव्हा आम्ही तीन आठवड्यांपूर्वी येथे आलो होतो, तेव्हा आम्ही सध्या ज्या परिस्थितीत आहोत, त्याबद्दल फक्त स्वप्नच पाहू शकत होतो.”