भारत- न्यूझीलंड यांच्यातील नेपियर येथील मॅक्लीन पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात डकवर्थ लुईसच्या नियमानुसार तो बरोबरीत सुटला असे जाहीर करण्यात आले. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ३ सामन्यांची टी२० मालिकेत १-० असा विजय मिळवत मालिका खिशात घातली. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. न्यूझीलंडला केवळ १६० एवढीच धावसंख्या करता आली. यात भारताच्या अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी आतापर्यंत कधीही न झालेला विक्रम केला आहे.
भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडविरुद्ध अविस्मरणीय गोलंदाजी करत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच मोठा कारनामा रचला गेला. न्यूझीलंडच्या त्या दोन खेळाडूंव्यतिरिक्त कोणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ते दोन खेळाडू म्हणजेच डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स होय. भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावर दबाव आणत शेवटच्या पाच षटकात ३० धावांत तब्बल ८ गडी गमावले. या दोघांच्या जोरावरच न्यूझीलंडला दीडशे धावांचा आकडा पार करता आला.
टीम इंडियाची दमदार गोलंदाजी
न्यूझीलंडच्या डावात भारतीय गोलंदाजांकडून कसलेली गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र, भारताच्या दोन गोलंदाज भलतेच चमकले. हे दोन गोलंदाज म्हणजेच अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज होय. या दोघांनीही न्यूझीलंडची फलंदाजी फळी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळण्यात सिंहाचा वाटा उचलला. अर्शदीपने यावेळी ४ षटके गोलंदाजी करताना ३७ धावा देत ४ गडी बाद केले. तसेच, सिराजने ४ षटके गोलंदाजी करताना १७ धावा देत ४ बळी आपल्या नावावर केल्या. या दोघांच्याही गोलंदाजीमुळे खास विक्रम नोंदवला गेला. भारतीय संघाच्या दोन गोलंदाजांनी एका आंतरराष्ट्रीय टी२० डावात ४ किंवा त्याहून अधिक गडी बाद करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. अर्शदीप आणि सिराजच्या या कामगिरीसाठी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
तत्पूर्वी सामन्यात भारताने न्यूझीलंडने ठेवलेल्या १६१ धावांचा पाठलाग करताना सुरुवात खराब केली. सलामीवीर ईशान किशन, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर स्वस्तात माघारी परतले. भारताचा ‘द- स्काय’ सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांनी धुव्वाधार फलंदाजी करत पॉवर प्ले मध्ये ५७ धावा केल्या. पण मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार बाद झाला. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि शेवटी सामना तिथेच थांबविण्यात आला. नऊ षटकात ७६ धावांची गरज असताना टीम इंडियाच्या ७५ धावा झाल्या होत्या. त्यामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार सामना बरोबरीत सुटला आणि १-०ने मालिका खिशात घातली.