IND vs NZ Tom Latham Statement on Bengaluru test match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. किवींनी हा कसोटी सामना ८ विकेट्सनी जिंकला. ज्यामुळे भारताला न्यूझीलंडकडून ३६ वर्षांनंतर मायदेशात कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला. भारतीय भूमीवर न्यूझीलंडचा हा कसोटी इतिहासातील फक्त तिसरा कसोटी विजय ठरला. या ऐतिहासिक कसोटी विजयानंतर टॉम लॅथमने मोठं वक्तव्य केलं आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने भारताला पहिल्या डावात ४६ धावांवर ऑल आऊट केल्यानंतर प्रत्युत्तरात पहिल्या डावात ४०२ धावा केल्या. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात ४६२ धावा केल्या आणि पाहुण्या संघासमोर १०७ धावांचे लक्ष्य ठेवले. किवी संघाने हे लक्ष्य सहज गाठले. न्यूझीलंडच्या या ऐतिहासिक विजयात भारतीय वंशाच्या रचिन रवींद्रने महत्त्वाची भूमिका निभावली. त्याने पहिल्या डावात १३४ आणि दुसऱ्या डावात नाबाद ३९ धावा करत विजयात मोलाचा वाटा उचलला.

विजयानंतर टॉम लॅथम काय म्हणाला?

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम म्हणाला, ‘आम्हीही प्रथम फलंदाजी करणार होतो. त्यामुळे नाणेफेक गमावणे आमच्यासाठी योग्य ठरले. आमच्या गोलंदाजांनी सातत्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, ज्याचा आम्हाला खूप फायदा झाला. पहिल्या दोन डावात आमच्या खेळांडूनी सामन्यावर पकड भक्कम केली. कारण आम्हाला माहित होते की भारत तिसऱ्या डावात पुनरागमन करेल. मात्र, आमच्या गोलंदाजांनी दुसऱ्या नवीन चेंडूने दमदार गोलंदाजी केली, ज्यामुळे सामना आमच्या पारड्यात झुकला.’

हेही वाचा – भारताच्या पराभवात CSK चा हात? रचिन रवींद्रने भारताला हरवण्यासाठी केली होती जोरदार तयारी, सामन्यानंतर केला मोठा खुलासा

रचिन आणि साऊदीच्या भागीदारीचा फायदा झाला –

टॉम लॅथम पुढे म्हणाला, ‘आम्हाला माहित आहे की टीम इंडिया मायदेशात किती बलाढ्य संघ आहे. मात्र, वरच्या फळीत आम्ही काही चांगल्या भागीदारी रचण्यात यशस्वी झालो. मला वाटते की त्यापैकी रचिन आणि साऊदी यांच्यातील भागीदारीमुळे आम्हाला खूप फायदा झाला. ज्यामुळे केवळ १०७ धावांचा पाठलाग करावा लागला, जे चांगले होते.’