टीम इंडिया तिसऱ्या टी २० सामन्यात ४ धावांनी पराभूत झाली. न्यूझीलंडने दिलेल्या २१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ २०८ धावाच करू शकला. विजय शंकर, ऋषभ पंत, कृणाल पांड्या आणि दिनेश कार्तिक या चार फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी केली. पण या चौघांनी केलेल्या फटकेबाजीनंतरही भारताचे प्रयत्न ४ धावांनी तोकडे पडले. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने मैदानावर केलेल्या एका कृत्याने भारतीय चाहत्यांना त्याचे पुन्हा एकदा फॅन बनवले.
सामन्यात महेंद्रसिंग धोनीला धमाकेदार खेळी करता आली नाही. मोठा फटका मारताना तो बाद झाला. पण यष्टीरक्षक म्हणून त्याने आपली भूमिका चोख बजावली. पण सामन्यात धोनी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या फलदांजीच्या वेळी १४व्या षटकात मैदानात अचानक एक चाहता धोनीच्या दिशेने धावत आला. चाहत्याच्या हातात भारताचा ध्वज होता. तो चाहता धोनीकडे धावत आला आणि तो त्याच्या पाया पडला. तो पाया पडण्यासाठी खाली वाकताना त्याच्या हातातील तिरंगादेखील जमिनीजवळ गेला. मात्र धोनीने तिरंग्याचा मान राखत तो तिरंगा हातात घेतला आणि तिरंग्याचा अवमान होऊ दिला नाही.
Respect for ms dhoni from national flag #Dhoni #icc #IndianAirForce #NarendraModi pic.twitter.com/HrlaaNpx7m
— Rakesh (@Rakesh58415969) February 11, 2019
हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून यानंतर धोनीबद्दल असलेला चाहत्यांच्या मनातील आदर अधिकच वाढला असल्याचे कमेंट्समधून दिसून येत आहे.