IND vs NZ 1st Test Virat Kohli broke MS Dhoni Record : न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटी सामन्यात भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीकडून सर्व चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण कोहलीने सर्वांची निराशा केली आणि एकही धाव न काढता आपली विकेट गमावली. मात्र, असे असतानाही टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडण्यात विराट कोहलीला यश आले. टीम इंडियाची बंगळुरू कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अत्यंत खराब कामगिरी पाहायला मिळाली, ज्यामध्ये संपूर्ण संघ केवळ ४६ धावांवर गारद झाला.
विराट कोहली आता फक्त सचिन तेंडुलकरच्या मागे –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आजही महान खेळाडू सचिन तेंडुलकरच्या नावावर असून, या यादीत विराट कोहली आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे, ज्याने एमएस धोनीचा विक्रम मोडला. कोहलीने टीम इंडियासाठी आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये ५३६ सामने खेळले आहेत. तर एमएस धोनीने २००४ ते २०१९ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी एकूण ५३५ सामने खेळले. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या सचिन तेंडुलकरने भारतीय संघासाठी एकूण ६६४ सामने खेळले आहेत.
विराट कोहली कारकिर्दीत ३८व्यांदा शून्यावर बाद –
विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला, ज्यामध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३८ व्यांदा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कोहली आता या बाबतीत हरभजन सिंगच्याही पुढे गेला आहे. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर सर्वाधिक वेळा बाद होण्याचा विक्रम झहीर खानच्या नावावर आहे, जो ४३ वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
हेही वाचा – IND vs NZ : बंगळुरु कसोटीत भारताची उडाली भंबेरी, ५५ वर्षानंतर न्यूझीलंडविरुद्ध नोंदवला लाजिरवाणा विक्रम
विराट कोहलीची तिसऱ्या क्रमांकावरील कसोटीतील कामगिरी –
कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कोहलीची सरासरी केवळ १६.१६ राहिली आहे. आतापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने केवळ ४१ धावांची सर्वोच्च खेळी साकारली आहे. म्हणजेच त्याच्या खात्यात अर्धशतकही नाही. आजच्या डावाचाही समावेश केला तर तो आतापर्यंत सात वेळा या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. विशेष म्हणजे शेवटच्या वेळी पण न्यूझीलंडविरुद्धच शून्यावर बाद झाला होता. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता.