IND vs NZ Shoaib Akhtar ask question to Virender Sehwag about Virat Kohli retirement : भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय चाहत्यांना विराट कोहलीकडून मोठा खेळीची अपेक्षा आहे. कारण मागे जेव्हा येथे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना जिंकला होता, तेव्हा विराटने द्विशतक झळकावून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एका कार्यक्रमात वीरेंद्र सेहवागला विराटच्या निवृत्तीबद्दल विचारले, त्यावर सेहवागने चोख प्रत्युत्तर दिले.
डीपी वर्ल्ड आयएल टी-२० चा तिसरा हंगाम ११ जानेवारी २०२५ रोजी सुरू होणार आहे. क्रिकेट दिग्गज वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर यांनी या प्रदेशातील प्रतिभा विकसित करण्यात आणि खेळाडूंना अनमोल अनुभव प्रदान करण्यात या लीगची महत्त्वाची भूमिका केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. गेल्या आठवड्याच्या शेवटी दुबई मरीनामध्ये एका यॉटवर आयोजित सीझन तीनच्या लाँच इव्हेंटमध्ये दोन्ही दिग्गज उपस्थित होते.
विराटच्या निवृत्तीवर सेहवाग अख्तरला काय म्हणाला?
या कार्यक्रमात बोलताना शोएब अख्तरने वीरेंद्र सेहवागला विचारले की, विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल तुम्हाला काय वाटते? याला उत्तर देताना सेहवागने म्हणाला की, तो तर अजून वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत खेळणार आहे, त्याचा फिटनेस अजून चांगला आहे आणि तो फॉर्ममध्येही दिसत आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ७० धावांची खेळी केली होती. यानंतर अख्तरने ३० वर्षांनंतर अडचण वाढते का असे विचारले, ज्याच्या उत्तरात सेहवाग म्हणाला की, त्याचा फिटनेस उत्कृष्ट आहे.
वीरेंद्र सेहवागने गेल्या दोन मोसमातील लीगच्या प्रभावावर बोलताना सांगितले की, “जेव्हा आपण डीपी वर्ल्ड आयएल टी-२० च्या शेवटच्या दोन हंगामांवर नजर टाकली, तर आपल्याला दिसून येईल की अनेक खेळाडू असे आहेत, जे मग यूएईमधील असोत किंवा अफगाणिस्तानसारख्या इतर देशांतील, त्यांनी आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा केली आहे.”
यूएईच्या खेळाडूंना लीगकडून उपलब्ध होत असलेल्या अनोख्या शिकण्याच्या संधींवरही त्याने भर दिला, “युएई संघासाठी, जेव्हा खेळाडू नऊ आंतरराष्ट्रीय स्टार्ससोबत खेळतात, तेव्हा त्यांना या अनुभवी खेळाडूंकडून शिकण्याची संधी मिळते. केवळ सामन्यांदरम्यानच नाही, तर सरावादरम्यान आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वत:ला तयार करतात, दबावाची परिस्थिती कशी हाताळतात, “त्यांना असा अनुभव इतर कोठेही मिळणार नाही.”