Virat Kohli Hits Bat on Ice Box after dismissal in IND vs NZ Test at Pune : भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडकडून ११३ धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. यादरम्यान भारताचा माजी कर्णधार आणि रन मशीन विराट कोहली पुन्हा एकदा त्याच्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. पुन्हा एकदा त्याची बॅट थंडावली आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत विराट कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरला, त्याने पहिल्या डावात केवळ १ धाव आणि दुसऱ्या डावात केवळ १७ धावा केल्या. या खराब कामगिरीमुळे त्याची निराशा आणि राग आता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मात्र, दुसऱ्या डावात बाद झाल्यानंतर त्याने अस काही केलं की, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रागाच्या भरात विराट कोहलीचा सुटला संयम –
दुसरी कसोटी संपल्यानंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कोहली दुसऱ्या डावात बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये परतताना दिसत आहे. यावेळी त्याने रागाच्या भरात आईस बॉक्सवर बॅट मारली. विराट कोहली स्वतःवर रागावलेला दिसत होता. त्याने ज्या आईस बॉक्सवर बॅट मारली, त्यामध्ये सामन्यादरम्यान खेळाडूंसाठी पाण्याच्या बाटल्या किंवा एनर्जी ड्रिंक्स थंड होण्यासाठी ठेवल्या जातात.
भारताने १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली –
भारतीय संघाने तब्बल १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. यासह घरच्या भूमीवर सलग १८ कसोटी मालिका जिंकल्यानंतर विजयी मालिका खंडित झाली. शेवटच्या वेळी टीम इंडियाला २०१२-१३ मध्ये चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडकडून २-१ ने पराभूत केले होते. त्यानंतर भारताने सलग १८ मालिका जिंकल्या. मात्र, आता न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत करून ही विजयाची मालिका खंडित केली आहे.
हेही वाचा – IND vs NZ : ऐतिहासिक विजयानंतर टॉम लॅथम भारावला, ‘या’ दोन खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय
भारताने २४ वर्षांत तिसऱ्यांदा सलग दुसरी कसोटी गमावली –
भारताने मायदेशात सलग दोन कसोटी गमावल्या आहेत. २०१२ नंतर टीम इंडियाने मायदेशात सलग दोन कसोटी गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०१२ मध्ये, इंग्लंडने वानखेडेवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत आणि ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत चार सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव केला हो. २००० नंतर २४ वर्षात टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग दोन कसोटी गमावण्याची ही तिसरी वेळ आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या आधी दक्षिण आफ्रिकेने ही कामगिरी केली होती. २००० मध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा २-० असा पराभव झाला होता. त्यावेळी आफ्रिकन संघाने वानखेडे आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडियाचा पराभव केला होता.