Sanjay Manjrekar on Virat Kohli: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन शतके झळकावल्यानंतर आता तो जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे त्याच्या फलंदाजीवरून दिसून येत आहे. भारत आता न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी तो सज्ज झाला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीला आपल्या फलंदाजीच्या जागेचा त्याग करण्याचा सल्ला दिला आहे.
वास्तविक, श्रेयस अय्यरला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो पहिला एकदिवसीय सामना खेळू शकला नाही. त्यांच्या जागी रजत पाटीदार यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल अशी आशा कमी आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या अनुपस्थितीत इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान दिले जाऊ शकते. अशा परिस्थितीत कोणाला खेळवायचे, हा प्रश्न संघ व्यवस्थापनासाठी अडचणीचा ठरू शकतो. या डोकेदुखीवर मांजरेकर यांनी एक अनोखा सल्ला दिला आहे.
संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीला दिला अनोखा सल्ला
स्टार स्पोर्ट्सवर याच समस्येवर बोलताना संजय मांजरेकर म्हणाले, “सध्या हे भारतीय संघासाठी खूप कठीण जाणार आहे. ही त्रुटी दूर करण्यासाठी मला एक उपाय सापडला आहे. शुबमन गिलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी नक्कीच करू शकतो. मात्र त्यानंतर विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकाऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे लागेल. हे कितपत शक्य होईल माहिती नाही पण हा एकच यावरील तोडगा आहे.”
मांजरेकर पुढे म्हणाले, “अनेक वर्षांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध किंग कोहलीने अंबाती रायडूसाठी असा त्याग केला होता. त्यामुळे माझ्या मते फलंदाजीचा क्रम निश्चित करण्याचा हा एकमेव मार्ग असू शकतो. इशानच्या द्विशतकानंतर, डावखुरा-उजवा अशा दोन्ही प्रकारचे फलंदाज सलामीला पाठवणे ही कल्पना वाईट नाही. कर्णधार रोहित शर्माने अनेक वर्ष शिखर धवनसोबत सलामी भागीदार म्हणून चागंल्या खेळी केल्या आहेत. आता धवन ऐवजी इशान किशन एवढाच काय तो फरक असेल. शेवटी हे माझे मत झाले राहुल द्रविड आणि रोहित शर्मा हेच अंतिम निर्णय घेतील.”
शुबमन गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात द्विशतक करणारा फलंदाज ठरला. गिलने बुधवारी (१८ जानेवारी) न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात २०८ धावांची वादळी खेळी केली. फलंदाज आणि गोलंदाजांच्या या उत्कृष्ट प्रदर्शनच्या जोररावर भारताने हा सामना १२ धावांनी जिंकला.