India vs New Zealand, World Cup 2023: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या क्रिकेट विश्वचषक २०२३चा पहिला उपांत्य फेरीचा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात मुंबईची उष्णता माहीत असूनही भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यात टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर ३९८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय फलंदाजीदरम्यान विराट कोहलीने न्यूझीलंड संघाकडे जात त्यांच्याकडे पाणी मागितले आणि त्यांच्या बाटलीने पाणी पीत असताना त्याचा व्हिडीओ आयसीसीने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत न्यूझीलंडसमोर विजयाचे मोठे लक्ष्य ठेवले. मात्र, सामन्यादरम्यान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या माजी कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो भारतीय डावात न्यूझीलंड संघासाठी आणलेले पाणी पिण्यासाठी त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्या बाटलीने पाणी पितो. यातून न्यूझीलंड संघाचे देखील कौतुक होत आहे. पाण्याला कोणीही नाही म्हणत नाही, हे न्यूझीलंडच्या खेळाडूने देखील दाखवून दिले.
विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावत सचिनचा मोडला विक्रम
न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतील ५०वे शतक झळकावले. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे सोडले. सचिनने वनडे मध्ये ४९ शतके झळकावली होती. शतक झळकावल्यानंतर विराट कोहली भावूक झाला. त्याने गुडघ्यावर बसून हेल्मेट काढले. मग तो उभा राहिला आणि सचिनसमोर नतमस्तक झाला. सचिन वानखेडेवर उपस्थित होता आणि विराटने त्याचा विक्रम मोडताना पाहिला. यानंतर विराटला आपल्यासमोर वाकताना पाहून सचिन उठला आणि त्याला शुभेच्छा दिल्या. सचिनकडून स्टँडिंग ओव्हेशन घेतल्यानंतर विराट अधिकच भावूक झाला. त्याचवेळी डेव्हिड बेकहॅम आणि संपूर्ण स्टेडियमने विराटला स्टँडिंग ओव्हेशन दिले. दरम्यान, पत्नी अनुष्का शर्माने आनंदात त्याला फ्लाइंग किस दिला.
भारतीय खेळीनंतर सचिन तेंडुलकरने विराट कोहलीचे जोरदार कौतुक केले आहे. उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी आलेला इंग्लंडचा फुटबॉल सुपरस्टार डेव्हिड बेकहॅमनेही विराट कोहलीचे कौतुक केले. सचिनने विराटचे वन डे क्रिकेटमध्ये ५० शतके पूर्ण करणे अविश्वसनीय असल्याचे वर्णन केले आहे. भारतीय खेळीनंतर सचिन म्हणाला, “आम्हा सर्वांना त्याचा अभिमान आहे. त्याची कारकीर्द अतुलनीय आहे.”
मिचेल-विल्यमसन यांच्यात शतकी भागीदारी
डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांच्यात शतकी भागीदारी झाली असून न्यूझीलंड संघ सामन्यात कायम आहे. डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन या दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण केली आहेत आणि न्यूझीलंडला लक्ष्याच्या जवळ नेत आहेत. ही भागीदारी भारतासाठी अत्यंत धोकादायक असून भारतीय गोलंदाजांना ती लवकरात लवकर मोडावी लागेल. ३१ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या २१३/२ आहे.