Shubman Gill Statements on Hardik Pandya: न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद १२६ धावांची खेळी करून भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा फलंदाज शुबमन गिल म्हणाला की, त्याने आपल्या शानदार खेळीत काही वेगळे केले नाही आणि आपला नैसर्गिक खेळ केला. धडाकेबाज इनिंग खेळल्यानंतर त्याने कर्णधार हार्दिक पांड्यासाठीचे आभार मानले.
भारतीय संघाने टी२० मालिकेत न्यूझीलंडचा २-१ असा पराभव केला आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाच्या भात्यात अनेक बाण होते, मात्र तीन बाण अचूक लक्ष्याला लागले, ज्यासमोर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ गारद झाला. या मालिकेतील पहिला सामना रांची येथे खेळला गेला. न्यूझीलंड २१ धावांनी जिंकला. मोठ्या फरकाने जिंकला. यानंतर दुसरा सामना लखनऊमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला होता. अशा स्थितीत तिसरा सामना अत्यंत महत्त्वाचा होता, जो जिंकून भारतीय संघाने मालिका खिशात घातली.
सामन्यानंतर शुबमन गिलचा खुलासा
सामन्यानंतर शुबमन गिल म्हणाला, “जेव्हा तुम्ही सराव करता आणि त्याचा सकारात्मक निकाल मिळतो तेव्हा छान वाटते. संघासाठी चांगली खेळी केल्याचा खूप आनंद आहे. षटकार मारण्याचे प्रत्येकाचे स्वतःचे तंत्र असते. तो म्हणाला, “हार्दिक भाईने मला माझा नैसर्गिक खेळ खेळायला सांगितले आणि मला काही अतिरिक्त करण्याची गरज नाही.”
कर्णधार हार्दिक पांड्याचे केले कौतुक
कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, “मैदानावर निर्णय घेताना तो सहसा आपल्या मनाचे ऐकतो.” हार्दिक पांड्या पुढे म्हणाला, “मी नेहमीच असा खेळ खेळलो आहे. मी परिस्थिती समजून घेतो आणि काळाच्या गरजेनुसार निर्णय घेतो. पराभवामुळे निराश न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने ‘उत्कृष्ट’ क्रिकेट खेळल्याबद्दल भारताचे कौतुक केले.”
पांड्याची अष्टपैलू कामगिरी आणि कर्णधारपद
मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने हार न मानता दमदार पुनरागमन केले. लखनऊ येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने प्रथम न्यूझीलंडला ९९ धावांत गुंडाळले आणि सामना ६ गडी राखून जिंकला. या सामन्यात एक विकेट घेतली आणि आवश्यक १५ धावाही केल्या. यानंतर, तिसऱ्या सामन्यात त्याने १६ धावांत ४ बळी घेतले आणि संपूर्ण किवी संघाला ६६ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात पंड्याने १७ चेंडूत ३० धावांची खेळीही खेळली. त्यामुळेच पांड्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.