IND vs NZ 3rd Test Mohammad Siraj replaced Jasprit Bumrah : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना शुक्रवारपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी मिळवणाऱ्या न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळत नाहीये. बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटी सामन्यातून का वगळले? जाणून घेऊया.

जसप्रीत बुमराहला का वगळले?

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने जसप्रीत बुमराहबद्दल नाणेफेकीच्या वेळी सांगितले की, बुमराहची तब्येत ठीक नाही, त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावा लागला. बुमराहने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये तीन विकेट्स घेतल्या होत्या. सिराजने बंगळुरू येथे झालेल्या पहिल्या कसोटीत दोन विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून त्याला वगळण्यात आले आहे.

रोहित शर्मा काय म्हणाला?

नाणेफेकीनंतर रोहित शर्मा म्हणाला की, ‘आम्ही मालिकेत अजून चांगली कामगिरी केलेली नाही. आम्हाला त्या गोष्टी सुधारण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. खेळपट्टी चांगली दिसत आहे. आशा आहे की आम्ही न्यूझीलंडला लवकरात लवकर रोखू आणि नंतर फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू. आमचे लक्ष या कसोटी सामन्यावर आहे. मुंबई कसोटीत चांगली कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. पुढे काय होणार आहे ते पाहणे आवश्यक आहे, परंतु वर्तमानात राहणे पण महत्वाचे आहे. त्यामुळे आज आम्हाला काय करावे लागेल, यावर लक्ष केंद्रित करु. आम्ही आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळणे महत्त्वाचे आहे, जे आम्ही या मालिकेत केले नाही. दुर्दैवाने बुमराहची तब्येत ठीक नाही. त्यांच्या जागी सिराजचा समावेश करण्यात आला आहे.’

हेही वाचा – IND vs NZ : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, भारताने बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला दिली संधी

टॉम लॅथम काय म्हणाला?

न्यूझीलंडकडून सलग दोन कसोटी सामने गमावल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचण्याच्या भारताच्या आशांना धक्का बसला आहे. मात्र, टीम इंडिया अजूनही डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याचवेळी न्यूझीलंडचा कर्णधार टॉस लॅथमने नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही प्रथम फलंदाजी करू असे सांगितले. ही खूप चांगली खेळपट्टी आहे. आशा आहे की आम्ही पुन्हा धावा करू आणि दबाव टाकू. निश्चितपणे या खेळावर लक्ष केंद्रित केले आहे. पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आम्ही याबद्दल बोललो. बंगळुरुमध्ये आम्ही जे केले ते विलक्षण होते. न्यूझीलंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. मिशेल सँटनरच्या जागी ईश सोधी आणि टिम साऊदीच्या जागी मॅट हेन्री संधी देण्यात आली आहे.