India vs New Zealand 1st T20 Playing 11, Pitch Report: ऑस्ट्रेलियातील टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर, शुक्रवारी वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. टी२० विश्वचषक २०२२ मध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचलेले २ संघ उद्यापासून एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी२० विश्वचषकानंतर टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही संघात प्रत्येकी ३ सामन्यांची टी२० आणि एकदिवसीय मालिका होणार आहे.
२०२१ मध्ये सुपर १२ टप्प्यात स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, भारताने फलंदाजीसह आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला ज्यामुळे त्यांना द्विपक्षीय मालिकेत अपेक्षित निकाल मिळायला सुरुवात झाली. पण २०२२ चा टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात येईपर्यंत भारतीय संघाच्या फलंदाजीतील दृष्टिकोनातून भरकटला आहे असे वाटत होते. विशेषत: पहिल्या सहा षटकांमध्ये, फलंदाजी आणि गोलंदाजीत इंग्लंडच्या आक्रमक खेळाच्या तुलनेत टीम इंडियाने अतिशय खराब प्रदर्शन केले.
पुढील टी२० विश्वचषक अजून दोन वर्षे बाकी असताना, भारताच्या खेळाडूंना इंग्लंडसारखे आक्रमक वृत्तीने खेळण्यासाठी स्वत:ला तयार करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. पुढील टी२० विश्वचषक स्पर्धेत संघाचा संभाव्य कर्णधार हार्दिक पांड्या रोहित शर्माच्या अनुपस्थितीत न्यूझीलंड दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याच वेळी, संघाचे प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सूचित केले आहे की आधुनिक खेळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापन फक्त टी२० तज्ञांचा समावेश करू इच्छित आहे. अनकॅप्ड इशान किशन आणि शुभमन गिल हे टी२० फॉरमॅटमधील पहिल्या सामन्याचे संभाव्य सलामीवीर असू शकतात. फलंदाजीतील प्रयोग सुरू असताना या वर्षी किशन आणि गिल सलामीवीर म्हणून खेळले असता त्यांना न्यूझीलंडमध्ये ठसा उमटवण्याची नामी संधी चालून आली आहे. ईशान किशनने अंडर-१९ विश्वचषकात भारताकडून सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर त्याने एकदिवसीयमध्ये पदार्पण केले.
गोलंदाजीचा विचार केल्यास भारताचा लेग-स्पिनर युजवेंद्र चहल, डावखुरा रिस्ट स्पिनर कुलदीप यादव आणि ऑफ-स्पिन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर खरी टीम इंडियाची भिस्त असणार आहे. क्रिकेट वर्तुळात अनेकांना आश्चर्यचकित करणारा टी२० विश्वचषकात भारताचा मुख्य फिरकीपटू असणारा चहलकडे स्वतःला सिद्ध करण्याची ही सुवर्ण संधी असणार आहे. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग नवीन चेंडूने गोलंदाजी करतील, तर उमरान मलिक त्याच्या वेगवान आणि अचूकतेने कशाप्रकारे गोलंदाजी करतो हे येणाऱ्या काळात समजेल. त्याचबरोबर हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज हे देखील त्याच्या मदतील असणार आहेत.
दुसरीकडे न्यूझीलंड आपला मजबूत संघ घेऊन केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. भारताप्रमाणेच न्यूझीलंडचा संघही विश्वचषकातील बाद फेरीतील आणखी एका पराभवातून सावरत असून दमदार पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरेल. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टच्या अनुपस्थितीत अन्य वेगवान गोलंदाजांना आजमावले जाण्याची अपेक्षा आहे.डेव्हॉन कॉनवे आणि फिन ऍलन यांच्या खांद्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. टी२० विश्वचषकादरम्यान विल्यमसनच्या स्ट्राईक रेटबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून त्याचीही लय साधण्यावर लक्ष असेल.
सामना कुठे आणि कधी पाहू शकणार
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.०० वाजता सुरु होणार आहे. हा सामना तुम्हाला अमेझॉन प्राइमवर लाइव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओ अॅपवर पाहू शकता. तसेच दूरदर्शनच्या डी डी स्पोर्ट्सवर देखील तुम्ही थेट प्रक्षेपण पाहू शकतात.
भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप यादव सिंग, हर्षल पटेल, मो. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंड संघ
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), लॉकी फर्ग्युसन, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर