IND vs NZ Yashasvi Jaiswal breaks Virender Sehwag’s record : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने तुफानी फलंदाजी केली. पुणे कसोटीच्या चौथ्या डावात टीम इंडियाला ३५९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात यशस्वीने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने वेगवान सुरुवात केली. मात्र, रोहित शर्माला त्याला जास्त वेळ साथ देता आली नाही, पण यशस्वीने एकट्याने किवी गोलंदाजांचा सामना करत अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह त्याने वीरेंद्र सेहवागचा मोठा विक्रम मोडला.
यादरम्यान यशस्वीने अवघ्या ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यशस्वीचे हे कसोटी क्रिकेटमधील आठवे अर्धशतक होते. यासह त्याने सेहवागला मागे टाकले. यशस्वी जैस्वाल अर्धशतक पूर्ण केल्यानंतर झपाट्याने त्याच्या शतकाकडे वाटचाल करत होता, परंतु त्याला मिचेल सँटनरने बाद केले. त्याने ६५ चेंडूत ७७ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ४ षटकारही मारले.
यशस्वी जैस्वालने मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम –
यासह भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वीच्या नावावर एक मोठा विक्रमही नोंदवला गेला. यशस्वीने भारतीय भूमीवर कसोटीत वीरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे. यशस्वी जैस्वालने भारतीय भूमीवर सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रम केला आहे. हा आकडा गाठण्यासाठी २२ वर्षीय यशस्वीने केवळ १३२५ चेंडूंचा सामना केला. तर वीरेंद्र सेहवागने भारतीय भूमीवर १४३६ चेंडूंचा सामना करत आपल्या १००० धावा पूर्ण केल्या होत्या. अशाप्रकारे यशस्वी जैस्वाल आता या बाबतीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
एवढेच नाही तर यशस्वी जैस्वाल या वर्षी १००० धावा पूर्ण करणारा एकमेव भारतीय ठरला आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षात १००० धावा करणारा यशस्वी जो रूटनंतर जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. या प्रकरणात, आपण रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडे पाहिले तर ते यावर्षी यशस्वी जैस्वालच्या जवळपासही नाहीत. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या या युवा सलामीवीर फलंदाजाने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे.