ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी-ग्रँडहोमने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने मालिकेत पहिला विजय नोंदवला. भारतीय संघाला 92 धावात गारद करण्यात न्यूझीलंडचा संघ यशस्वी झाला. बोल्टने 5 तर डी-ग्रँडहोमने 3 विकेट घेतल्या. भारताच्या आघाडीच्या फळीतले फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर अपयशी ठरले. अशा परिस्थितीत तळातल्या फळीतले युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे भारतासाठी धावून आले. चहलने सामन्यात 18 धावांची खेळी केली, जी भारतीय फलंदाजीतली आजच्या सामन्यातली सर्वोत्तम खेळी ठरली.

अवश्य वाचा – IND vs NZ : हॅमिल्टनमध्ये ढेपाळलेला भारतीय संघ नेटकऱ्यांकडून ट्रोल

दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चहलने 37 चेंडूंत 3 चौकारांसह नाबाद 18 धावा केल्या. याशिवाय दहाव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये चहलने दुसरे स्थान पटकावले. या विक्रमात जवागल श्रीनाथ ( वि. पाकिस्तान, 1998) अव्वल स्थानावर आहे. त्याने 43 धावा केल्या होत्या.

शिखर धवन, कर्णधार रोहित शर्मा, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक हे सर्व फलंदाज आज अपयशी ठरले. कुलदीप यादव व चहल या जोडीनं थोडा संघर्ष केला, परंतु ते संघाला शंभरी पार करून देऊ शकले नाही. या जोडीने नवव्या विकेटसाठी 25 धावा जोडल्या. या सामन्यातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.

अवश्य वाचा –  IND v NZ : रोहितच्या प्रगतीचा आलेख चढता, मात्र ऐतिहासिक सामन्यात विक्रमाची संधी गमावली