India vs Pakistan ICC Cricket World Cup 2023: भारत आणि पाकिस्तानचे संघ शनिवारी (१४ ऑक्टोबर) विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका कायम ठेवण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत सात सामने झाले आहेत. टीम इंडियाने सर्व सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हे पाहण्यासाठी बड्या व्यक्ती अहमदाबादला पोहोचत आहेत.
भारतीय संघाच्या बहुतांश सामन्यांच्या वेळी विराट कोहलीची पत्नी अनुष्का स्टेडियममध्ये उपस्थित असते. अहमदाबादला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये ती सचिन तेंडुलकर आणि दिनेश कार्तिकसोबत होती. कार्तिकने त्यांचा एकत्र प्रवास करणारा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे या सामन्याचा उत्साह आणखी शिगेला पोहचला आहे.
प्रसिद्ध गायक अरिजित सिंगही अहमदाबादला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर तो परफॉर्म करणार आहे. अरिजित वर्षभरात दुसऱ्यांदा या स्टेडियममध्ये परफॉर्म करणार आहे. याआधी, तो आयपीएल २०२३च्या सलामीच्या सामन्यापूर्वी दिसला होता. या तीन गायकांव्यतिरिक्त, मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचतील. त्याचवेळी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही स्टेडियममध्ये राहून हा सामना पाहणार आहे.
एकीकडे विश्वचषक सुरू होण्यापूर्वी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले नव्हते, तर दुसरीकडे आता भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज गायक आणि अभिनेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री, बीसीसीआयने ट्वीट केले की त्या कार्यक्रमात दिग्गज गायक अरिजित सिंग, सुखविंदर सिंग आणि गायक-संगीतकार शंकर महादेवन हे सादरीकरण करताना दिसणार आहेत. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये हे तीन गायक आपल्या आवाजाची जादू पसरवणार आहेत.
भारत-पाकिस्तान सामन्यात अहमदाबादची खेळपट्टी काय रंग दाखवणार?
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच चांगली मानली जाते. येथे बॅटवर चेंडू स्कीट होऊन येतो, त्यामुळे या मैदानवर मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. क्रिकेट चाहत्यांना आज चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळू शकते. पण नवीन चेंडूवर वेगवान गोलंदाज मदत मिळू शकते.
येथे आतापर्यंत एकूण २९ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २३७ धावांची आहे. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १६ सामने जिंकले आहेत. मात्र, विश्वचषकातील न्यूझीलंड-इंग्लंड सामन्यात न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी करत सामना मोठ्या फरकाने जिंकला होता.
वेदरकॉमने दिलेल्या हवामान अंदाजानुसार, शनिवारी अहमदाबादमध्ये कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि किमान २६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. संपूर्ण सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही आणि आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.