भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोरच्या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर १८२ धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताने सामन्यात प्रथम फलंदाजी करत १८१ धावा केल्या. या सामन्यामध्ये माजी कर्णधार विराट कोहलीला हरवलेली लय गवसल्याचं दिसून आलं. सामन्याच्या सुरुवातीला के. एल. राहुल आणि रोहित शर्माने दमदार सुरुवात केल्यानंतर विराटने डावाला आकार दिला. मात्र मधल्या फळीमधील भारताचे दोन हुकुमी एक्के असणारे ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या स्वस्तात मागे परतले. मागील सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून देणाऱ्या पंड्याला या सामन्यात खातंही उघडता आलं नाही. मात्र चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर एकामागोमाग एक पंत आणि पंड्या ड्रेसिंग रुममध्ये परतल्याने रोहित त्यांच्यावर चांगलाच खवळल्याचं दिसून आलं.

नक्की पाहा >> IND vs PAK Asia Cup: नाद करा पण विराटचा कुठं! खणखणीत षटकार लगावत साजरं केलं अर्धशतकं; Video झाला Viral

भारताची पहिली विकेट ५१ धावांवर गेली जेव्हा रोहित २८ धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर संघाची धावसंख्या ६२ वर असताना के. एल. राहुलच्या रुपात भारताला दुसरा झटका बसला. त्यानंतर धावसंख्या ९१ वर असताना सुर्यकुमार यादवही १० चेंडूमध्ये १३ धावा करत तंबूत परतला. सुर्यकुमार बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या पंतने १२ चेंडूत १४ धावा केल्या. दोन चौकार लगावल्यानंतर एक तिरका फटका खेळण्याच्या नादात शादाब खानच्या गोलंदाजीवर पंत असिफ अलीकडे झेल देत तंबूत परतला. पंत चुकीचा फटका मारताना बाद झाल्याबद्दल रोहित त्यांच्यावर संतापल्याचं ड्रेसिंग रुममध्ये पहायला मिळालं. रोहित पंतला तुझा फटका कसा चुकला हे सांगत होता तर दुसरीकडे पंत त्याची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न हातवाऱ्यांसहीत करत होता, असं दृष्य कॅमेरात कैद झालं.

पंतनंतर फलंदाजीसाठी आलेल्या मागील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील हिरो ठरलेल्या हार्दिक पंड्या तर दुसऱ्याच चेंडूवर तंबूत परतला. त्याला खातंही उघडता आलं नाही. रोहित पंतवर चिडत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी पंतवर टीकाही केली आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या मागील सामन्यात पंतला संघात स्थान देण्यात आलेलं नव्हतं. तर पंतने पाकिस्तानविरुद्धचा मागील सामना जिंकून देण्यात मोलाचं योगदान दिलं होतं. या सामन्यात मात्र दोघेही पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसून आलं.