Sanju Samson on Asia Cup 2023: संजू सॅमसनची आशिया कप२०२३ मध्ये राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. ग्रुप स्टेजच्या दोन्ही सामन्यांसाठी तो संघासोबत श्रीलंकेत होता, पण येत्या रविवारी १० तारखेला होणाऱ्या सुपर-४मधील पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी तो भारतात परतला आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे, विकेटकीपर के.एल. राहुलचा संघात समावेश करण्यात आला आहे.
आशिया कपमध्ये सुपर-४ सामने सुरू झाले आहेत. बांगलादेशला पराभूत केल्यानंतर पाकिस्तान आता भारताविरुद्ध दोन हात करणार आहे. दुसरीकडे सुपर-४ मधील टीम इंडियाचा हा पहिला सामना असेल. हा महामुकाबला आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे. दुखापतीमुळे ग्रुप स्टेजच्या सामन्यात सहभागी न होऊ शकलेल्या के.एल. राहुल आता श्रीलंकेत टीम इंदियासोबत सराव करत असून त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. राहुलला आधीच भारतीय संघात निवडले होते पण तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने एनसीएमध्येच सराव करत होता. राहुलने NCA मधील फिटनेस चाचणी उत्तीर्ण करून संघात प्रवेश केला आहे. तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल तर राखीव खेळाडू म्हणून संघात समाविष्ट असलेला संजू सॅमसन श्रीलंकेतून भारतात आला.
श्रीलंकेतून भारतात येताच संजू सॅमसन यूएईला रवाना!
भारतीय यष्टीरक्षक संजू सॅमसनचे चाहते खूप भावनिक आहेत. त्यातही काही जण हे त्याच्या बाजूने बोलतात तर काहीजण त्याच्या विरोधात कमेंट करतात. काही चाहत्यांना त्याला मुख्य संघात पाहण्याची इच्छा आहे आणि दुसरीकडे त्याच्या वगळण्याला समर्थन देत आहे. संजूचा वर्ल्ड कप२०२३साठीच्या संघातही समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याचे चाहते सोशल मीडियावर निवडकर्त्यांवर टीका करत होते. के.एल. राहुल संघात सामील झाल्यानंतर आशिया कपमध्ये संजू सॅमसनची गरज नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याला टीममधून बाहेर काढण्यात आलं आहे. संजूने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, विमानाच्या आतून काढलेल्या या फोटोसोबत संजूने हॅलो आणि यूएईचा ध्वज जोडला आहे. संजू यूएईला गेल्याचे यातून दिसते.
भारताने नेपाळला त्यांच्या दुसऱ्या गट सामन्यात दहा गडी राखून पराभूत करून आशिया चषक २०२३च्या सुपर-४ टप्प्यासाठी पात्र ठरले. मेन इन ब्लू त्यांचा पहिला सुपर-४ सामना रविवार, १० सप्टेंबर रोजी आर.जे. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल. उभय संघांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.