Shahid Afridi On Team India At World Cup 2023: सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली, रोहित शर्मा ते अगदी नव्या पिढीतील शुबमन गिल, के. एल. राहुल यांसारख्या फलंदाजांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय संघाने क्रिकेट विश्वात आता आपली सर्वांगीण छाप पाडली आहे .भारत आता जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी सारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज तयार करण्यासाठी देखील ओळखला जात आहे. दमदार संघाच्या जोरावर नुकताच भारताने आशिया चषक मायदेशी आणला आणि आता विश्वचषक २०२३ चे यजमानपद सांभाळताना सुद्धा भारत विजयी पथावर आहे. यामागे भारतीय खेळाडूंची प्रचंड मेहनत व कोट्यावधी भारतीयांच्या प्रार्थना आहेत. पण पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने मात्र भारतीय संघाच्या यशाचं श्रेय भलत्याच गोष्टीला दिले आहे.
जिओन्यूजच्या वृत्तानुसार, आफ्रिदी एका स्थानिक स्पोर्ट्स शोमध्ये बोलताना म्हणाला, “भारताची लोकसंख्या १.४ अब्ज आहे आणि क्रिकेटचा दर्जा (गेल्या काही वर्षांत) बदलला आहे. तेव्हा आम्ही म्हणायचो की भारत उत्तम फलंदाज तयार करत आहेत तर पाकिस्तान चांगले गोलंदाज तयार करत आहे, पण तसे नव्हते कारण आम्ही गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही तयार करत होतो… आता मात्र, त्यांचे गोलंदाज आता मांसाहार करू लागले आहेत, त्यामुळे त्यांना ताकद मिळाली आहे, “
आफ्रिदी पुढे म्हणाला की, “याशिवाय भारताने युवा क्रिकेटपटूंना पुढे आणण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत उत्तम गुंतवणुक केली आहे. संपूर्ण राहुल द्रविड सारख्या खेळाडूच्या हातात प्रशिक्षणाची जबाबदारी देऊन त्यांनी तळागाळातील क्रिकेटपटुंना पुढे आणले आहे. त्याला (द्रविडला) माहित आहे की खेळाडूला टॉपला पोहोचण्यासाठी काय आवश्यक आहे. संघाने कठोर परिश्रम केले आणि आता ते आपली छाप जगावर पड़फ्ट आहे. भारताला हवं असल्यास ते आता दोन संघ तयार करू शकतात.”
दरम्यान, अशाच प्रकारच्या समजुती अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतात. यावर एकदा विराट कोहलीने २०२२ मध्ये त्याच्या पोस्टवरील एका चाहत्याच्या कमेंटला देखील प्रतिसाद देत हे स्पष्ट केले की ” मांस खाल्ल्याशिवाय मसल वाढवता येत नाही हे जगातील सर्वात मोठं मिथक आहे”.
हे ही वाचा<< शुबमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज! IND vs PAK आधी बीसीसीआयने दिला ‘हा’ मोठा अपडेट
२०१८ मध्ये विराट कोहलीने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीने मांसाहार बंद केल्याचे कारण सांगितले होते. कोहली म्हणाला, “मला मणक्याचा त्रास झाला होता, त्यामुळे माझ्या करंगळीत मुंग्या आल्याप्रमाणे वाटायचं आणि मला फलंदाजी करण्यात खुप कष्ट घ्यावे लागत होते. नंतर माझ्या चाचण्या झाल्या. त्यात समजलं माझ्या पोटात आम्ल साचले आहे होते, माझ्या शरीरात खूप जास्त प्रमाणात युरिक ऍसिड तयार होत होते, जे माझ्या हाडांमधून कॅल्शियम खेचू लागले होतेज्यामुळे हाडे ठिसूळ होत होती. हे सर्व टाळण्यासाठी मी शाकाहाराहाकडे वळलो. “