IND vs AFG, World Cup 2023, Virat vs Naveen: आयसीसी वर्ल्डकप २०२३चा ९वा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर संपन्न झाला. टीम इंडियाचा हा सामना माजी कर्णधार विराट कोहलीच्या घरच्या मैदानावर खेळवला गेला. अशा परिस्थितीत संपूर्ण क्रिकेट स्टेडियम पूर्णपणे खचाखच भरले जाणे अपेक्षित होते आणि तसेच झाले. याशिवाय, अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे सामन्याचा थरार शिगेला पोहोचेल मात्र, सामन्यादरम्यान एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली. विराटने नवीन-उल-हकची गळाभेट घेतली. त्यामुळे दोघांमध्ये अखेर समेट घडून आला असे म्हणता येईल. विराटने मोठे मन दाखवले आणि चाहत्यांना देखील न चिडवण्याची विनंती केली. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान एक दृश्य पाहायला मिळाले ज्याने चाहत्यांची मने जिंकली. वास्तविक, सामन्यादरम्यान नवीन-उल-हक आणि विराट कोहली एकमेकांना मिठी मारताना दिसले, ज्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहितीसाठी की, कोहलीने जेव्हा नवीनला मिठी मारली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. दुसरीकडे, जेव्हा दिल्ली स्टेडियममध्ये प्रेक्षकांनी हे दृश्य पाहिले तेव्हा रोमांच शिगेला पोहोचला होता. हे खास दृश्य पाहून चाहत्यांनी कोहली-कोहलीचा जल्लोष सुरू केला. दोघांमधील ही दिलजमाई चाहत्यांनाही आवडली आहे. आयपीएल २०२३मध्ये कोहली आणि नवीन यांच्यात खूप भांडण झाले होते.
दिल्लीत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान नवीन-उल-हकसमोर विराट कोहली फलंदाजी करत होता. काहीतरी गरमागरम घडेल अशी अपेक्षा होती पण घडले नेमके उलटे. नवीन आणि विराट कोहलीने एकमेकांना मिठी मारली. विराट कोहली जेव्हा नॉन स्ट्राइक एंडला आला तेव्हा नवीन-उल-हकशी काही संवाद झाला आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या पाठीवर थाप मारत मिठी मारली. हे दृश्य लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावर कॉमेंट्री बॉक्समध्येही चर्चा झाली. गौतम गंभीर कॉमेंट्री करत होता.
कोहली आणि नवीन यांच्यातील या घडामोडीचं कॉमेंट्री बॉक्समध्ये कौतुक झालं. मात्र, गंभीरने प्रेक्षकांना सांगितले की, “दुसऱ्या देशातून कोणताही खेळाडू आला तर त्याला ट्रोल करू नका. याआधी नवीन उल हकला पाहून प्रेक्षकांनी कोहली-कोहलीचा नारा दिला होता. कोणत्याही खेळाडूला ट्रोल करणे चुकीचे आहे. अफगणिस्तानातील खेळाडू भारतात आयपीएल खेळायला येतात ही त्यांना मिळणारी खूप मोठी संधी आहे. एक भारतीय म्हणून त्यांचे स्वागत करणे आपले काम आहे.”
भारताने अफगाणिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला
विश्वचषक २०२३ मध्ये भारताची विजयी मोहीम सुरूच आहे. आपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा आठ विकेट्सने पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ गडी गमावून २७२ धावा केल्या. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने ८० धावांची तर अजमतुल्ला उमरझाईने ६२ धावांची खेळी खेळली.