Fakhar Zaman wins the hearts of fans in IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबोमध्ये खेळला जाणारा सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. यादरम्यान सामना थांबेपर्यंत भारताने २४.१ षटकात १४७ धावा केल्या होत्या. या दरम्यान पाकिस्तानी खेळाडू फखर जमान अचानक सोशल मीडियावर लोकप्रिय झाला. सामना थांबल्यानंतर तो ग्राउंड स्टाफला मदत करताना दिसला. फखरने कर्मचार्यांसह खेळपट्टी झाकण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वास्तविक, कोलंबोमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी हवामान स्वच्छ होते. मात्र टीम इंडियाचा जवळपास निम्मा डाव संपल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. हे पाहून कोलंबोचे आर. प्रेमदासा स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनी मैदान झाकण्यास सुरुवात केली. यावेळी फखरने ग्राउंड स्टाफला मदत केली. त्यांनी कर्मचाऱ्यांसह मैदानावर कव्हर टाकण्यास सुरुवात केली. फील्ड कव्हर करण्यासाठी वापरले जाणारे कव्हर्स खूप जड असतात. त्यामुळे मैदान झाकण्यासाठी अनेक लोकांची गरज असते.
फखर जमानने जिंकली चाहत्यांची मनं –
फखरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये तो कर्मचाऱ्यांना मदत करताना दिसत आहे. फखरच्या या कृतीने चाहत्यांची मने जिंकली. सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानसोबतच भारतीय चाहतेही फखरचे कौतुक करत आहेत.
हेही वाचा – IND vs PAK: १४ धावा करताच केएल राहुलने केला खास पराक्रम, वनडेत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय फलंदाज
पावसामुळे खेळ थांबला –
मुसळधार पावसामुळे सामना थांबवावा लागला. सामना थांबला तोपर्यंत टीम इंडियाने २४.१ षटकात २ गडी गमावून १४७ धावा केल्या होत्या. सध्या केएल राहुल २८ चेंडूत १७ धावा आणि विराट कोहली १६ चेंडूत ८ धावांवर नाबाद आहेत. तिसर्या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत ३८ चेंडूत २४ धावांची भागीदारी झाली आहे. आज हा सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर या सामन्यासाठी उद्याचा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.