Sourav Ganguly on Asia Cup: आशिया कप २०२३ जसजसा जवळ येत आहे तसतसे भारत विरुद्ध पाकिस्तान या सर्वात महत्वाच्या सामन्याबद्दल क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने २ सप्टेंबर रोजी कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा भारत-पाक सामना कोण जिंकणार? याबाबत भाकीत वर्तवले आहे.
२ सप्टेंबर रोजी होणार्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला, “माझ्यासाठी आवडते खेळाडू निवडणे खूप कठीण आहे. ते दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. पाकिस्तान हा चांगला संघ असून ते कोणत्याही मोठ्या टीमला त्यांचा दिवस असेल त्यावेळी हरवतात. अर्थातच भारत खूप चांगला संघ आहे. या सामन्यात जो संघ चांगली कामगिरी करेल त्याला विजय मिळेल. मात्र, पाकिस्तानचा संघ हा बाबर आझमच्या नेतृत्वात सध्या चांगली कामगिरी करत आहे.”
दादा (गांगुली) पुढे म्हणाला, “जसप्रीत बुमराहने आयर्लंडमध्ये उत्तम कामगिरी केली आणि ही भारतासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याने करिअरची सुरुवात टी२० मध्ये केली असून आता त्याला वन डेमध्ये १० षटके टाकावी लागणार आहेत. त्यामुळे कालांतराने त्याचा फिटनेस चांगला होत जाईल. भारत आणि पाकिस्तान सामन्यात जो संघ चांगल्या रीतीने दबाव हाताळू शकतो तोच हा सामना जिंकेल असे मला वाटते.”
युजवेंद्र चहलला आशिया कपमधून वगळण्याबद्दल विचारले असता, माजी भारतीय कर्णधार गांगुली म्हणाला, “तुमच्याकडे फक्त तीन फिरकीपटू आहेत आणि मला वाटते की त्यांनी अक्षर पटेलला निवडून योग्य गोष्ट केली आहे कारण, तो फलंदाजी करू शकतो.” आशिया चषक २०२३ मध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. त्याचबरोबर या सामन्यादरम्यान मैदानावर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. आता या सामन्यात कोणता संघ कोणावर मात करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आशिया चषकाला ३० ऑगस्टपासून पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामन्याने सुरुवात होणार आहे. यावेळी ही स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये होणार आहे. आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तानात खेळवले जाणार असून अंतिम सामन्यासह नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. टीम इंडिया आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. ती २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना कँडी येथे होणार आहे.
स्पर्धेतील पहिला सामना मुलतानमध्ये खेळवला जाणार आहे
स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ अ गटात आहेत. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आहेत. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी, श्रीलंकेच्या भूमीवर पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ३१ ऑगस्ट रोजी कॅंडीमध्ये होणार आहे.
आशिया कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. बॅकअप: संजू सॅमसन