India vs Pakistan ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याला दणक्यात सुरूवात झाली आहे. पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये शतकं पाहायला मिळाली. एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आता क्रिकेटमधील हायव्होल्टेज सामना म्हणजेच भारत वि. पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. हा सामना २३ फेब्रुवारीला दुबईमध्ये होणार आहे. दुबईमध्ये दोन्ही संघांचा एकमेकांविरूद्ध रेकॉर्ड कसा आहे, जाणून घेऊया.
भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवत विजयासह मोहिमेची सुरूवात केली. आता टीम इंडियाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी २३ फेब्रुवारीला दुबईच्या मैदानावर होणार आहे. या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे आणि या मैदानावर बांगलादेश, पाकिस्तान, हाँगकाँग आणि अफगाणिस्तानविरुद्ध सामने खेळले आहेत.
दुबईच्या मैदानावर टीम इंडिया अजिंक्य
भारतीय संघाने दुबईच्या मैदानावर आतापर्यंत एकूण ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ जिंकले आहेत आणि एक सामना बरोबरीत राहिला आहे. या मैदानावर टीम इंडियाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला नाही आणि भारताने सर्व प्रतिस्पर्धी संघांना पराभूत केले आहे.
भारताने दुबईच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील हे सामने एकदिवसीय आशिया चषक २०१८ मध्ये खेळले गेले. एका सामन्यात भारताने ८ विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात ९ विकेटने विजय मिळवला होता. आता ७ वर्षांनंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा दुबईच्या मैदानावर एकदिवसीय सामना खेळणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांकडे स्टार खेळाडू आहेत, जे अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा रोख बदलू शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हायव्होल्टेड सामना असतो. फक्त भारत पाकिस्तान नाही सर्वच संघांचे चाहते हा सामना पाहत असतात. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानी संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. त्यांना पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ६० धावांनी पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे, पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर ६ विकेट्सने विजय मिळवला होता.