Women’s Asia Cup 2024 Streaming : महिला टी-२० आशिया चषक २०२४ स्पर्धेला १९ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान महिला संघांमधील सामना शुक्रवारी (१९ जुलै) श्रीलंकेच्या डंबुला येथे होणार आहे. भारत अ गटात पाकिस्तान, यूएई आणि नेपाळसह आहे. हरमनप्रीत कौरचा संघ २१ जुलैला यूएईविरुद्ध खेळणार आहे. त्याचवेळी २३ तारखेला नेपाळशी सामना होणार आहे. टीम इंडिया गट फेरीतील आपले सर्व सामने डंबुलामध्ये खेळणार आहे. हे सर्व सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार याबद्दल जाणून घेऊया.

गेल्या एका वर्षात भारतीय महिला क्रिकेट संघाने १७ टी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी १० जिंकले आहेत. संघाला ५ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला असून २ सामने अनिर्णित राहिले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने गेल्या वर्षभरात १९ टी-२० सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. भारतापेक्षा जास्त सामने खेळूनही पाकिस्तानच्या महिलांनी केवळ सात सामने जिंकले आहेत आणि १२ गमावले आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड –

भारतीय आणि पाकिस्तानी महिला संघ १४ टी-२० सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. या १४ सामन्यांपैकी भारताने ११, तर पाकिस्तानने ३ जिंकले आहेत. या प्रतिस्पर्ध्यामध्ये भारताचे वर्चस्व कायम आहे. महिला आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये ६ सामने झाले आहेत. भारताने ५ सामने जिंकले आहेत. २०२२ मध्ये पाकिस्तानने एकमेव सामना जिंकला होता. आशिया चषक टी-२० मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध पाचपैकी चार विजय हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मिळवले आहेत. २०१२ च्या स्पर्धेत मिताली राजने भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला होता.

हेही वाचा – Paris Olympics 2024 : गोल्डन बॉय पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज! जाणून घ्या नीरज चोप्राने आतापर्यंत किती पदकं जिंकली आहेत?

भारत विरुद्ध पाकिस्तान महिला आशिया चषक टी-२० सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग भारतात कधी, कुठे पहावे?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला आशिया कप टी-२० सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग भारतात डिस्ने प्लस हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

भारत विरुद्ध पाकिस्तान महिला आशिया कप टी-२० सामना भारतात कधी, कुठे पाहता येणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला आशिया कप टी-२० सामन्याचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी सात वाजता भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल.