पाकिस्ताने टी २० विश्वचषकामध्ये भारताचा मानहानीकारक पराभव केल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला आणखीन एक धक्का तेव्हा बसला जेव्हा सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्याला एक विचित्र प्रश्न विचारण्यात आला. एका पत्रकाराने विराटला पुढील सामन्यामध्ये रोहित शर्माच्या जागी इशान किशनला संधी दिली जाईल का असा थेट सवाल विराटला विचारला तेव्हा विराट गोंधळला.
किशानने इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये ४६ चेंडूंमध्ये ७० धावांची खेळी केली होती. मात्र रविवारच्या पाकिस्तानविरोधातील सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. या सामन्यात रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यामुळे पत्रकाराने थेट रोहितऐवजी किशानला संधी देणार का असा प्रश्न विराटला सामन्यानंतर विचारला. त्यावर विराटने, “हा फार धाडसी प्रश्न आहे, तुम्हीच सांगा सर काय वाटतं?,” असा प्रतिप्रश्न पत्रकाराला केला.
“मला जो सर्वोत्तम संघ वाटला तो मी मैदानात उतरवला, यावर तुमचं काय मत आहे?”, असंही विराटने पुढे जरा रागातच त्या पत्रकाराला विचारलं. “तुम्ही टी २० च्या आंतरराष्ट्रीय सामन्यामधून रोहित शर्माला वगळणार ना? तुम्ही रोहित शर्माला वगळणार? आम्ही खेळलेल्या या पूर्वीच्या सामन्यात त्याने काय केलं आहे तुम्हाला माहितीय ना? बरोबर ना? अविश्वसनिय प्रश्न आहे,” असं विराट म्हणाला. त्यानंतर तो थोडा थांबून चेहऱ्याला हात लावून हसू लागला.
नंतर विराटने पुन्हा पत्रकाराकडे पाहिलं आणि तो म्हणाला, “तुम्हाला वादग्रस्त विधानं हवी असतील तर तसं मला आधी सांगत जा म्हणजे मी तशी उत्तरं देईन,” असं म्हटलं. तुम्हीच पाहा पत्रकार परिषदेमधील हा व्हिडीओ…
आधी फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारताला बसला. टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते. मात्र, कोहलीच्या संघाला अपेक्षित खेळ करण्यात अपयश आले. १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठत टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली. रिझवानने ५५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७९ धावांची, तर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली.