IND W vs PAK W T20 World Cup Final: टी-२० महिला विश्वचषक २०२४ मध्ये भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव करत पहिला विजय मिळवला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर मैदानात आलेल्या सजना सजीवनने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. या मोठ्या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मात्र पाकिस्तानसाठी योग्य ठरला नाही. आणि पाकिस्तानने ठराविक अंतराने विकेट्स गमावत निर्धारित २० षटकांत १०५ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत पाकिस्तानी संघावर दबाव कायम ठेवला. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात अरूंधती रेड्डिने १९ धावा देत ३ विकेट्स घेतल्याने तिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे.
हेही वाचा – IND vs BAN T20 Live Score: वरूण चक्रवर्तीच्या खात्यात दुसरी विकेट, बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत
भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारतीय संघाला पहिल्या टी-२० वर्ल्डकप सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर उत्कृष्ट गोलंदाजी केल्यानंतर आऊटफिल्ड स्लो असल्याने १०६ धावसंख्येचं लक्ष्य गाठण्यासाठीही भारताला खूप प्रयत्न करावे लागले. भारताकडून शफाली वर्माने आठव्या षटकात पहिला चौकार लगावला. भारतीय संघाचा नेट रन रेट चांगला नसल्याने टीम इंडिया गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहे. पण या विजयानंतर टीम इंडियाने २ गुण मिळवत एका स्थानाची झेप घेतली आहे. पण तरीही भारताचा नेट रेन रेट अजूनही – 1.22 आहे.
हेही वाचा – Richa Ghosh : रिचा घोषने एका हाताने उत्कृष्ट झेल टिपत वेधलं सर्वांचे लक्ष, VIDEO होतोय व्हायरल
पाकिस्तानकडून अनुभवी फलंदाज निदा दार हिने २८ धावांची मोठी खेळी केली. याशिवाय मुनीबा अली १७ धावा करत बाद झाली. कर्णधार फातिमाने २ चौकार मारत सामना वळवण्याचा प्रयत्न केला पण आशा शोभनाने तिला रिचा घोषकरवी बाद करत मोठी विकेट मिळवून दिली. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. रेणुका सिंगने पहिल्याच षटकात विकेट मिळवली. तर दीप्ती शर्मा, आशा शोभना यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली. श्रेयंका पाटीलने २ विकेट तर सामनावीर ठरलेल्या अरूंधती रेड्डीने सर्वाधिक ३ विकेट घेतले.
भारतीय संघाला मोठ्या विजयाची गरज
T20 विश्वचषकातील टीम इंडियाच्या गटाबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडचा संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे आणि तो जिंकला आहे, त्याxचा निव्वळ रन रेट +2.900 आहे. ऑस्ट्रेलियन संघ एका सामन्यातून दोन गुण आणि +1.908 च्या नेट रन रेटने दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील. याचाच अर्थ भारताला इथून बाकीचे दोन्ही सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील, एकही सामना हरला तर उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग कठीण होईल. जर भारतीय संघाने पाकिस्तानविरूद्धचा सामना १०.२ षटकांत जिंकला असता तर त्यांचा नेट रन रेट प्लसमध्ये झाला असता.