India vs Pakistan: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्या सर्व शक्यता नाकारल्या आहेत ज्यात भारत आणि पाकिस्तान नजीकच्या भविष्यात द्विपक्षीय कसोटी मालिका खेळण्याची योजना आखत असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी दोन्ही देशांचा सामना तटस्थ ठिकाणी खेळवण्याच्या योजनेला मंजुरी दिल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांमध्ये आले होते असे एएनआयने सांगितले. मात्र, बीसीसीआयच्या सूत्रांनी याला केराची टोपली दाखवली आहे. पुढे बोलताना त्यांनी “अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका”, अशा स्पष्ट शब्दात हे वृत्त फेटाळले आहे.
भारतासोबत द्विपक्षीय मालिका अन्य ठिकाणी घेण्याच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वक्तव्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) प्रतिक्रिया आता समोर आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणत्याही द्विपक्षीय मालिकेची कोणतीही योजना नाही.” या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना बीसीसीआयच्या एका अधिकृत सूत्राने सांगितले की, ‘भविष्यात किंवा आगामी काळात अशी कोणतीही मालिका खेळवण्याची योजना नाही. आम्ही पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय मालिका खेळण्यास तयार नाही.”
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये बातमी जोरात होती की पीसीबी चेअरमन नजम सेठी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिकेला ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यास मान्यता दिली. मात्र भारताने अशी कुठलीही महिती किंवा अहवाल साधा चर्चेला सुद्धा आलेला नाही त्यामुळे त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही देशांमधील संबंध जवळपास एक दशकापासून ताणले गेले आहेत आणि शेवटच्या वेळी दोन्ही देशांनी द्विपक्षीय मालिका २०१२ मध्ये खेळली होती, जेव्हा पाकिस्तान भारत दौऱ्यावर होता. तेव्हापासून दोन्ही देश केवळ आयसीसी स्पर्धा किंवा आशिया कपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात.
या वर्षी होणार्या आशिया चषक आणि त्यानंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही देश आमनेसामने आहेत. यावेळी आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानमध्ये केले जाणार आहे परंतु भारताने यापूर्वीच आपला संघ येथे पाठवण्यास नकार दिला आहे. बीसीसीआयचा एका अधिकाऱ्याशी बोलताना त्याने सांगितले की, “परदेशातचं काय पाकिस्तानात सुद्धा आम्ही कधी जाणार नाही. जिथे आशिया चषकासाठी आम्ही पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार देत आहोत तिथे द्विपक्षीय मालिका तर दूरच, त्यामुळे या चर्चेला कुठलाही आधार नाही.”
बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष जय शाह यांनी ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित करावी, अन्यथा भारत त्यात सहभागी होणार नाही, अशी सूचना केली. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड (एसएलसी) यांनीही ही स्पर्धा पाकिस्तानमधून बाहेर हलवण्याबाबत मंजुरी दिली, त्यानंतर पीसीबीने त्यासाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्याची चर्चा केली आहे. पीसीबीला स्पर्धेचा किमान पहिला टप्पा पाकिस्तानात खेळवायचा आहे आणि त्यानंतरचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांना खेळायचे आहे. ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे. याआधी, पाकिस्तान येथेही आपल्या सामन्यांसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्याबाबत बोलत होता. पाकिस्तानचे सामने श्रीलंका किंवा बांगलादेशात व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती. मात्र यानंतर त्यांनी हा प्रस्ताव मागे घेत वनडे वर्ल्डकपसाठी आपला संघ भारतात पाठवण्याचे संकेत दिले आहेत.