IND vs PAK India’s Record ICC Events Against Pakistan : ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज (रविवारी) हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. स्पर्धेतील सर्वात महत्त्वपूर्ण सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ एकमेकांसमोर असणार आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आयसीसी स्पर्धेतील एकमेकांविरूद्ध खेळण्याची २२वी वेळ असणार आहे. आजवरची आयसीसी स्पर्धेतील दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली आहे. या स्पर्धांमध्ये कोण-कोणाला किती वेळा पराभूत केलं याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वचषक सामन्यांमध्ये (८-०)

एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध खेळले गेलेले आठही सामने जिंकले आहेत. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ४ मार्च १९९२ रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या १९९२ च्या वर्ल्डकपच्या सामन्यात इम्रान खानच्या नेतृ्त्वाखालील पाकिस्तानी संघाचा ४३ धावांनी पराभव केला होता. तर १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये वसीम अक्रम याच्या नेतृ्त्वाखालील संघाविरोधात ९ मार्च १९९६ रोजी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या क्वार्टरफायनल सामन्यात भारताने ३९ धावांनी विजय मिळवला होता.

१९९९ च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये ८ जून १९९९ रोजी मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे सामना झाला होता. या सामन्यात देखील पुन्हा एकदा अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील संघाने वसीम अक्रमच्या संघाला ४७ धावांनी पराभूत केले.

२००३ साली सेंच्युरियन सुपरस्पोर्ट पार्क येथे वनडे वर्ल्डकपचे ६ सामने खेळवण्यात आले होते, १ मार्च २००३ रोजी भारत पाकिस्तान यांच्यातील सामना झाला. या सामन्यायत सचिन तेंडूलकरने ७५ चेंडूत ९८ धावा ठोकल्या होत्या. भारताने ४ गडी कमावून २७४ धावांचे लक्ष ४५.४ षटकांत गाठले होते

मोहालीतील पीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या २०११ च्या वनडे वर्ल्डकप सेमिफायनलमध्ये सचिन तेंडुलकरने पुन्हा एकदा भारतासाठी सर्वाधिक धावा (८५) केल्या आणि ३० मार्च २०११ रोजी धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला २९ धावांनी विजय मिळवून दिला.

२०१५ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान सामना एडलेड येथे झाला होता, येथे भारताने ७६ धावांनी पाकिस्तानला पराभूत गेले होते. या सामन्यात विराट कोहलीने शतक (१०७) धावांची खेळी केली होती. तर २०१९ च्या वर्ल्डकप सामन्यात रोहित शर्माच्या (१४०) शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानला १६ जून २०१९ रोजी मॅनचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात ८९ धावांनी नमवले होते.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १४ ऑक्टोबर २०२३ रोजी खेळल्या गेलेल्या २०२३ च्या वनडे वर्ल्डकप सामन्यात भारताने ३०.३ षटकांत तीन गडी गमावत १९२ धावांचे लक्ष्य गाठले होते. या सामन्यात ७ गडी राखून पाकिस्तानविरोधात मोठा विजय मिळवला होता.

टी-२० वर्ल्डकप (७-१)

भारताने २००७ टी-२० वर्ल्डकपदरम्यान १४ सप्टेंबर २०७ रोजी डरबन येथे खेळल्या गेलेल्या भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानला बॉल-आऊट करत पराभूत केले होते. यावेळी भारत पाकिस्तान हे दोन संध फायनलमध्ये देखील एकमेकांसमोर आले होते. या २४ सप्टेंबर २००७ रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात देखील धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने पाच धावांनी विजय मिळवला होता. जोहान्सबर्गमधील द वॉन्डरर्स येथे हा सामना झाला होता.

२०१२ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये धोनीच्या नेतृ्त्वाखालील संघाने कोलंबो येथे ३० सप्टेंबर २०१२ रोडी झालेल्या सामन्यात ८ विकेट्सनी विजय मिळवला होता. तर २०१४ साली देखील मीरपूर येथे २१ मार्च रोजी झालेल्या सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवला होता.

२०१६ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये कोलकात्याच्या एडन गार्डन मैदानावर १९ मार्च २०१६ रोजी भारत-पाक समाना रंगला आणि यामध्ये भारताने सहा विकेट्सनी विजय मिळवला.

२०२१ टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने पहिल्यांदाच पराभवाचे तोंड पाहिले. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाक संघाने एकही गडी न गमावता १५२ धावांचे लक्ष १७.५ षटकांमध्ये गाठले होते. यानंतर २०११ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सामन्यात २३ ऑक्टोबर २०२२ रोजी भारताने चार विकेट्सनी पाकिस्तानला पराभूत केले. तर २०२४ टी-२० वर्ल्डकप दरम्यान भारताने न्यूयॉर्क येथे झालेल्या सामन्यात ९ जून २०२४ रोजी पाकिस्तानला सहा धावांनी हरवले.

चॅम्पियन्स ट्रॉफी (२-३)

२००४ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत १९ सप्टेंबर २००४ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे सामना खेळवण्यात आला होता. ज्यामध्ये इंझमाम-उल-हकच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा ३ विकेट्सने पराभव केला होता. तर २००९ साली २६ सप्टेंबर रोजी सेंचुरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात युनूस खानच्या संघाने ५४ धावांनी विजय मिळवला.

१५ जून २०१३ रोजी बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८ विकेट्सने पराभव केला होता. तर २०१७ विराट कोहली नेतृत्वाखालील संघाने ४ जून २०१७ रोजी एजबॅस्टन येथे खेळलेल्या सामन्यात सरफराज अहमदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाचा १२४ धावांनी पराभव केला. १८ जून रोजी द ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर १८० धावांनी विजय मिळवला होता.