Harbhajan Singh on Mohammed Shami: शार्दुल ठाकूर हा वन डे फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग मानला जातो आणि २०२३ आशिया चषकामध्ये पाकिस्तान विरुद्ध भारताच्या सलामीच्या सामन्यादरम्यान तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. या सगळ्या दरम्यान भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीचा समावेश व्हावा अशी मागणी केली आहे.
मोहम्मद शमीला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी वगळण्यात आले कारण, भारताने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजची संघात निवड केली होती, तर शार्दुल ठाकूर हा तिसरा वेगवान गोलंदाज होता. आता आशिया चषक २०२३च्या सुपर-४ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात १० सप्टेंबर रोजी सामना होणार आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शमी, सिराज आणि बुमराह या त्रिकुटासह योग्य गोलंदाजी लाइनअप असेल, असं म्हणाला होता. त्यानंतर तो असेही म्हणाला, “भारताने पाकिस्तानविरुद्ध अष्टपैलू वेगवान गोलंदाजांसह खेळले पाहिजे. मात्र, धावा काढण्याची जबाबदारी प्रामुख्याने फलंदाजांवर असली पाहिजे,” असे म्हणत त्याने रोहितवर निशाणा साधला.
हरभजन सिंग म्हणाला, “मला विश्वास आहे की शमीने पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळले पाहिजे. तुम्ही अनुभव विकत घेऊ शकत नाही आणि शमीसारखा अनुभवी खेळाडू बाहेर बसवणे माझ्यातरी बुद्धीला पटत नाही. शमीने सिराजबरोबर खेळावे. जर सिराजला खेळवायचे असेल तर शार्दुल ठाकूरकडून फलंदाजीची अपेक्षा करू नका. तुमच्याकडे सातव्या क्रमांकापर्यंतचे फलंदाज आहेत, त्यानंतर योग्य गोलंदाज असलेच पाहिजेत. तुमच्या फलंदाजांना धावा करण्यास सांगा. त्यांनी २६६ धावा जरी केल्या तरी एकूण धावसंख्येचा बचाव करण्याची जबाबदारी गोलंदाजांची आहे.”
भज्जी पुढे म्हणाला, “अनेक लोक म्हणतात की शार्दुल फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतो, मी सहमत आहे. जो कोणी मोहम्मद शमीला बाहेर ठेवणारा कर्णधार असेल तो सामना नक्की गमावेल. अर्धवट मनाने सामन्यात प्रवेश करू शकत नाही. शार्दुल जे करतो ते सिराज करू शकतो का? नाही. तसेच, जे शमी करतो ते शार्दुल करू शकत नाही. जर मोहम्मद शमी आणखी चांगली कामगिरी करू शकत असेल तर गोलंदाजी मजबूत करा आणि तुमच्या फलंदाजांना धावा करायला सांगा.”
भारताने नेपाळला त्यांच्या दुसऱ्या गट सामन्यात दहा गडी राखून पराभूत करून आशिया चषक २०२३च्या सुपर-४ टप्प्यासाठी पात्र ठरले. मेन इन ब्लू त्यांचा पहिला सुपर-४ सामना रविवार, १० सप्टेंबर रोजी आर.जे. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल. उभय संघांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.