भारतीय संघ दुबईत आशिया चषक खेळत असून सुपर ४ च्या पहिल्याच सामन्यात त्यांना पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. रविवारी 4 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात भारताचा पाच विकेट्सनी पराभव झाला. भारतीय संघ पाकिस्तानच्या संघाला १८२ धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यापासून रोखण्यात अयशस्वी ठरला. त्यामुळे भारताच्या क्रिकेटप्रेमींना सध्या विश्रांती घेत असलेल्या गोलंदाजांची आठवण झाली आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश आहे.
जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर आहे. दरम्यान त्याची पत्नी संजना गणेशन हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट जसप्रीतबरोबरच एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोवर बुमराहच्या चाहत्यांनी काही कठोर कमेंट्स केल्या आहेत. यातील एका चाहत्याला संजनाने चोख उत्तर देऊन त्याची बोलती बंद केली आहे.
कोण म्हणतं भारत अर्शदीपमुळे हरला? टीम इंडियाच्या पराभवाची ‘ही’ आहेत कारणं
संजनाने बुमराहबरोबरच फोटो पोस्ट करत आपल्या पोस्टमध्ये लिहलंय, ‘मी, जसप्रीत आणि त्याच्या बुटांचा थ्रोबॅक फोटो.’ संजनाने लिहलंय की हे बूटच या फोटोमधील खरे स्टार्स आहेत. हा फोटो वेगाने व्हायरल झाला असून त्यावर अनेक क्रिकेटप्रेमींनी कमेंट्स केल्या आहेत. यातील एका चाहत्याने लिहिले की, इथे पाकिस्तानसमोर टीम इंडियाची अवस्था बिकट होत चालली आहे आणि तुम्ही लोक फिरत आहात. यावर संजनाने उत्तर दिले की “थ्रोबॅक फोटो आहे, तो दिसत नाही का, चोमू माणसा?” संजनाच्या या कमेंटवर हजारो लाइक्स आले. चाहत्यांनी तिची ही स्टाइल खूपच आवडली आहे.
![ind vs pak](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/09/WhatsApp-Image-2022-09-06-at-8.02.08-AM.jpeg?w=830)
जसप्रीत बुमराहबद्दल अनेक चाहत्यांनी लिहिले की, पाजी, लवकर परत या. काहींनी लिहिलं की, तुमच्याशिवाय इथं संघाची अवस्था बिकट झाली आहे. जसप्रीत बुमराह हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा प्रमुख गोलंदाज आहे, परंतु आशिया चषकापूर्वी तो जखमी झाला होता. त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला.
आशिया चषकानंतर भारताला दोन मालिका खेळायच्या आहेत, त्यानंतर टी२० विश्वचषक सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहचे पुनरागमन ही भारतासाठी चांगली बातमी असेल. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेपर्यंत जसप्रीत बुमराह तंदुरुस्त होऊन संघात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. १५ सप्टेंबरपर्यंत टी२० विश्वचषकासाठी संघ जाहीर होणार आहे, अनेक देशांच्या संघांनी आपले संघ घोषित केले आहेत. आशिया चषकानंतर टीम इंडिया आपल्या १५ खेळाडूंची घोषणा करू शकते, अशी चर्चा आहे.